समाजात तेढ निर्माण होणारे विधान केल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडी कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे यांनी जाणीवपूर्वक बहुजन समाजात तेढ निर्माण होऊन जातीय दंगली घडवण्याच्या व मनुष्य आणि वित्तहानी करण्याच्या उद्देशाने लोकांना गैरमार्गाने एकत्रित करून राष्ट्रीय एकात्मतेला तडा पोहोचेल असे बेताल वक्तव्य करून एका विशिष्ट धर्माविरुद्ध बदनामी केली आहे. हे भाषण आरोपीने दंगली घडवून दहशत माजविण्याचा उद्देशाने सोशल मीडियाद्वारे प्रसारित केले आहे. तसेच बहुजन समाजाचे मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा गैरवापर करून महापुरुषांच्या नावाची बदनामी केली आहे. म्हणून आरोपी मिलिंद रमाकांत एकबोटे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्या तक्रारीनुसार आम्ही गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे”, असे कोंढवा पोलिसांकडून सांगण्यात आले.