रुग्णालयाला बेकायदा परवाना; आरोग्य अधिकाऱ्यांवर गुन्हा

पुणे : हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णावर चुकीचे उपचार करुन त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरुन  डॉक्टरांसह १५ जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला. नऱ्हे भागातील एका रुग्णालयात ही घटना वर्षभरापूर्वी घडली होती. दरम्यान, रुग्णालयाला  बेकायदा परवाना दिल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी  दशरथ वाल्हेकर, नामदेव वाल्हेकर, जयश्री चंद्रकांत वाल्हेकर, आकाश नामदेव वाल्हेकर, अजिंक्य नामदेव वाल्हेकर, सिटरीन हेल्थकेअर प्रा. लि. चे संचालक तसेच आधार मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अभिनंदन बुद्रुक, डॉ. दीपक शिंदे, डॉ. महेश दरेकर, डॉ. पुष्कर शहा, डॉ. सलमान खान बशीरखान पठाण, डॉ. सचिन लकडे, डॉ. तेजस्विनी वाघमारे, डॉ. दिलीप माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. काशिनाथ सौदागर तळेकर (वय ६९,रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) यांनी यासंदर्भात सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेकर यांचे मेहुणे गणेश गोरे यांना गेल्या वर्षी हदयविकाराचा झटका आला होता. त्यांना तातडीने नऱ्हे भागातील आधार मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्या वेळी तेथे असलेले डॉ. पठाण यांनी गोरे यांच्यावर उपचार सुरु केले. पठाण हे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्या वेळी पठाण यांनी एका खासगी रुग्णालयातील डॉ. सचिन लकडे यांना समाजमाध्यमाद्वारे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाची माहिती दिली, तसेच वैद्यकीय तपासणीबाबतचा अहवाल पाठविला. डॉ. लकडे यांनी गोरे यांना इंजेक्शन देण्यास सांगितले. हे इंजेक्शन देण्यास तीन तासांचा विलंब झाला. त्यानंतर डॉ. तेजस्विनी वाघमारे रुग्णवाहिकेतून आधार मल्टिस्पेशलिटी रुग्णालयात आल्या. गोरे यांना रुग्णावाहिकेतून घेऊन जाते, असे सांगून डॉ. वाघमारे तेथून गेल्या. काही वेळानंतर डॉ. वाघमारे पुन्हा रुग्णालयात आल्या.

गोरे यांना इंजेक्शन देण्यास विलंब केला. त्यांच्यावर वेळेत उपचार झाले असते तर त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला असता. चुकीचे उपचार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप तळेकर यांनी फिर्यादीत केला. दरम्यान, या प्रकरणी तळेकर यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीत डॉक्टरांनी गोरे यांच्यावर उपचार करण्यास विलंब केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे निरीक्षण समितीकडून नोंदविण्यात आले.

दरम्यान, आरोपी वाल्हेकर तसेच डॉ. बुद्रुक, डॉ. शिंदे, डॉ. दरेकर यांनी संगनमत करुन बनावट दस्तऐवज केले. पुणे महानगर क्षेत्र प्राधिकरणाची परवानगी नसताना रुग्णालयाचे बांधकाम केले. वैद्यकीय व्यवसाय बाबत ठरवून दिलेल्या निकषांचे पालन केले नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी रुग्णालय बांधण्यास परवानगी दिली, असे तळेकर यांनी फिर्यादीत म्हटले होते. त्यानंतर चौकशीत डॉ. माने यांनी बेकायदा परवाना दिल्याचे उघडकीस आले.