पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महालोकअदलतीत पाऊण लाख खटले शनिवारी (९ एप्रिल) निकाली काढण्यात आले.
शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात तीन लाखांपेक्षा जास्त खटले प्रलंबित आहेत. त्यामध्ये दिवाणी आणि फौजदारी खटल्यांचा समावेश आहे. लोकअदालतीत दाखलपूर्व आणि दाखल झालेले खटले दोन्ही बाजूंच्या संमतीने तडजोडीत मिटविण्यात येतात. या उपक्रमामुळे न्यायालयावर पडणारा ताण कमी होण्यास मदत होते. तसेच पक्षकारांना न्यायालयीन प्रक्रियेसाठी वेळ द्यावा लागत नाही. त्यामुळे पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे लोकअदालत या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या महालोक अदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
लोकअदालतीपुढे ९८ हजार ३७२ खटले मांडण्यात आले होते. त्यापैकी ७५ हजार १९६ खटले तडजोडीअंती निकाली काढण्यात आले. त्यात ५२ हजार ८५७ दाखलपूर्व खटल्यांचा समावेश आहे. लोकअदालतीत वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध केलेल्या कारवाईचे खटले मांडण्यात आले होते. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे वाहन परवाने जप्त करण्यात आल्याने या संदर्भातील खटले तडजोडीसाठी मांडण्यात आले होते. त्यामुळे वाहनचालकांची गर्दी झाली होती. वाहनचालकांची गर्दी विचारात घेऊन स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. मुख्य जिल्हा न्यायाधीश सुमंत कोल्हे आणि विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव महेश जाधव यांनी लोकअदालतीत सहभागी झालेल्यांना मार्गदर्शन केले.