पिंपरी-चिंचवडच्या निगडी परिसरात कॅशव्हॅनच्या कर्मचाऱ्याला चाकूचा धाक दाखवून अज्ञात इसमाने २५ लाख रुपये लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दुपारी दीड वाजल्याच्या सुमारास निगडी येथील यमुनानगर परिसरात हा प्रकार घडला असून, सीसीटीव्हीमध्ये लुटीचा हा प्रकार कैद झालेला आहे.  एलआयसीच्या आकुर्डी, वाकड आणि निगडी या ३ शाखांमधून २५ लाखांची रक्कम चेकमेट कंपनीच्या कॅशव्हॅनमध्ये भरण्यात येत होती, यावेळी संधी साधून अज्ञात चोरट्याने चालकाला चाकूचा धाक दाखवत ही रक्कम लुटली आहे. सध्या निगडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेकमेट कंपनीची कॅशव्हॅन आकुर्डी आणि वाकड परिसरातून कॅश घेऊन निगडीच्या एलआयसी शाखेजवळ आली होती. निगडी शाखेतील रक्कम जमा करुन एकून २५ लाख ५१ हजार रुपये घेऊन कंपनीचा कर्मचारी व्हॅनकडे जात होता. यावेळी टोपी घातलेल्या एका शस्त्रधारी इसमाने संधी साधून चालकाच्या हातावर चाकूने वार करत २५ लाखांची बॅग हिसकावून पोबारा केला. या झटापटीत कॅशव्हॅनच्या चालकाच्या हाताला दुखापतही झाली आहे. महेश पाटणे असं जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. बॅग हिसकावणाऱ्या चोरट्यासोबत दोन दुचाकींवर चौघे जण त्या व्यक्तीच्या मदतीसाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे.

पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांनुसार, कॅशव्हॅनमध्ये रक्कम भरत असताना कंपनीचे चार कर्मचारी सोबत असणं गरजेचं असतं. मात्र या घटनेच्या वेळी चेकमेट कंपनीचे केवळ दोनचं कर्मचारी हजर होते. त्यामुळे चोरट्याला बॅग हिसकावून पोबारा करणं शक्य झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र भर दुपारी मनुष्यवस्ती असलेल्या ठिकाणात लुटीचा प्रकार घडल्यामुळे आरोपीला पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर निर्माण झालेलं आहे.