डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणात एका हल्लेखोराला पकडण्यात आल्याचे वृत्त ऐकले. गेली पाच वर्षे या प्रकरणाचा तपास सुरू होता. अडीच वर्षांपूर्वी पहिली अटक झाली होती. आता केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सचिन अंदुरे याला अटक केल्याने तपासाच्या प्रगतीमध्ये महत्त्वाचे पाऊल पडले आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. दाभोलकर यांचे पुत्र हमीद  यांनी व्यक्त केली. मात्र, एवढय़ावरच न थांबता सीबीआयने या खुनाची पाळेमुळे खोदून काढावीत, अशी अपेक्षा त्यांनी मांडली.

दाभोलकर खुनाच्या तपासामध्ये उच्च न्यायालयाने देखरेख केली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सतत पाच वर्षे ‘जवाब दो’ या विवेकी आंदोलनांच्या माध्यमातून जाब विचारत सरकारवर दबाव ठेवला आहे. आता दाभोलकर यांच्या खुनाच्या पूर्ण कटाचे चित्र सीबीआय लवकरच उघड करेल, अशी आशा असल्याचे हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरानजीक असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दुचाकीस्वार हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर राज्यातच नव्हे तर देशभरात खळबळ उडाली होती. पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांकडून गेली पाच वर्षे डॉ. दाभोलकर यांच्या मारेक ऱ्यांना पकडण्यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आले होते.