News Flash

सतीश शेट्टी खूनप्रकरणी भाऊसाहेब आंदळकरांना सीबीआय कोठडी

सीबीआयने तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना बुधवारी गजाआड केले होते

तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी खून प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेल्या भाऊसाहेब आंदळकर यांना न्यायालयाने १६ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. बुधवारी सीबीआयने ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांना गजाआड केले होते. त्यांना गुरुवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले.
तळेगाव दाभाडे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते आणि भ्रष्टाचारविरोधी दक्षता समितीचे जिल्हा संघटक सतीश भोजा शेट्टी यांचा सन १३ जानेवारी २०१० रोजी तळेगावात भरदिवसा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. शेट्टी यांचा खून होण्यापूर्वी त्यांनी लोणावळा येथील भूखंड खरेदीचे प्रकरण माहिती अधिकाराचा वापर करून उघडकीस आणले होते. शेट्टी यांनी वडगाव मावळ आणि लोणावळा परिसरातील अनेक प्रकरणे उघडकीस आणली होती. शेट्टी यांचा खून झाल्यानंतर खळबळ उडाली होती. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून शेट्टी खूनप्रकरणात अॅड. विजय दाभाडे, सराईत गुंड श्याम दाभाडे, डोंगऱ्या राठोड यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, शेट्टी खून प्रकरणात त्यांच्याविरुद्ध सकृतदर्शनी पुरावे न आढळल्याने भादंवि १६९ अनुसार न्यायालयाने त्यांची मुक्तता केली.
शेट्टी खूनप्रकरणाचा तपास न्यायालयाच्या आदेशाने सीबीआयकडे सोपविण्यात आला. शेट्टी खूनप्रकरणाच्या अनुषंगाने सीबीआयने पुन्हा तपास सुरू केला. आजी-माजी पोलीस अधिकारी, आयआरबी कंपनीतील अधिकारी अशा २६ जणांची सत्यशोधन तपासणी (लाय डिटेक्टर) करण्यात आली. दरम्यान, शेट्टी यांच्या मारेकऱ्याचा शोध न लागल्यामुळे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले. सीबीआयकडून गेल्या चार वर्षांत शेट्टी यांच्या खूनप्रकरणाच्या अनुषंगाने जवळपास नऊशे जणांची चौकशी करण्यात आली, तसेच ५५० जणांचे जबाब नोंदविण्यात आले होते. दरम्यान, शेट्टी खूनप्रकरणात सीबीआयच्या पथकाने ग्रामीण पोलिसांच्या कार्यालयावर छापा टाकून तेथून संगणक आणि कागदपत्रे जप्त केली होती. यापूर्वी सीबीआयने आंधळकर यांची चौकशी केली होती. त्यांची सत्यशोधन चाचणी घेतली होती. मात्र, त्या वेळी फारसे काही निष्पन्न झाले नव्हते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2016 4:13 pm

Web Title: cbi custody to bhausaheb andhalkar in satish shetty murder case
Next Stories
1 राज्यसेवा परीक्षेत नगरचा अतुल कानडे अव्वल
2 निवृत्त पोलीस निरीक्षक आंधळकर यांना सतीश शेट्टी खून प्रकरणी अटक
3 प्रवाशांच्या उन्हाळी लूटमारीसाठी खासगी वाहतूकदारांची तयारी सुरू
Just Now!
X