03 December 2020

News Flash

डिझेल कागदावर अन् दहा कोटी खिशात!

दौंड रेल्वे डेपोमध्ये दहा कोटी रुपये किंमतीचे डिझेल केवळ कागदोपत्री वापरल्याचे दाखवून इतकी रक्कम हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

| April 27, 2013 02:45 am

दौंड रेल्वे डेपोमध्ये दहा कोटी रुपये किंमतीचे डिझेल केवळ कागदोपत्री वापरल्याचे दाखवून इतकी रक्कम हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तेथील डेपोचा मुख्य निरीक्षक वीर सिंग चौधरी याला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (सीबीआय) अटक केली आहे. या गैरव्यवहारात वरिष्ठांचाही सहभाग असण्याची शक्यता सीबीआयने व्यक्त केली आहे.
सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस. व्ही. यार्लगड्डा सिंग यांनी चौधरीला तीन मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. रेल्वेच्या दौंड डेपोमध्ये अधिकाराचा गैरवापर करून कागदपत्रावर खोटय़ा नोंदी करून डिझेलचा घोटाळा केल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती. त्यानुसार सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दौंड रेल्वे डेपो आणि वीरसिंग याच्या घरावर २३ फेब्रुवारी रोजी छापा टाकला. हा छापा टाकण्यासाठी सीबीआयने न्यायालयाकडून परवानगी घेतली होती. या छाप्यामध्ये सीबीआयला डिझेलच्या नोंदी असलेली कागपदत्रे मिळाली होती. केलेल्या तपासादरम्यान सिंग याने २० लाख ३३ हजार ९२ लिटर हाय स्पीड डिझेलचा घोटाळा केल्याचे उघडकीस आले.
याप्रकरणी सिंग याने अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने दोन वेळा त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. सीबीआयकडून त्याच्या अटकेचे प्रयत्न सुरू होते. सीबीआयने सिंगला सीआरपीसी कलम १६० नुसार हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार गुरूवारी सिंग हा आपल्या वकिलामार्फत हजर झाला. सीबीआयने अटक करून त्याला न्यायालयात हजर केले. सीबीआयचे वकील अॅड. विवेक सक्सेना आणि आयुब पठाण यांनी आरोपीकडे तपास करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. या गुन्ह्य़ात आरोपीकडून आणखी कागदपत्रे जप्त करायची आहेत. याप्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का याचा तपास करायचा आहे. घोटाळ्यातील पैशाचा वापर कशासाठी झाला, या गोष्टींचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद सरकार पक्षाकडून करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय गोखले करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 2:45 am

Web Title: cbi investigates diesel corruption in daund railway depot
टॅग Cbi,Diesel
Next Stories
1 ‘शासनाच्या निर्णयानुसार आराखडय़ाची कागदपत्रे द्या’
2 भारतीय चित्रपटसृष्टीचे खरे जनक कोण? – उच्च न्यायालयात याचिका दाखल
3 स्वारगेट चौकातील बांधकाम काढण्याची आयुक्तांकडे मागणी
Just Now!
X