पोलिसांकडून तीन महिन्यांची मुदत; कॅमेरे न बसवल्यास कारवाई

शाळांच्या बाहेर होणारी छेडछाड तसेच छेडछाड करणाऱ्या टोळक्यांवर जरब बसविण्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून पावले उचलण्यात आली आहेत. शाळेबाहेर थांबणाऱ्या टोळक्यांकडून छेडछाडीच्या घटना घडतात. टोळक्यांवर कारवाई करण्यासाठी पुणे जिल्हय़ातील सर्व शाळांच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. कॅमेरे न बसविणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याचा इशारा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे.

बारामती परिसरात एका महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱ्या मुलीने छेडछाडीमुळे आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेची ग्रामीण पोलीस अधीक्षक पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे. शाळेबाहेर थांबणाऱ्या टोळक्यांकडून देण्यात येणऱ्या त्रासाची तक्रार बऱ्याचदा मुली करत नाहीत. असे प्रकार मुली कु टुंबीयांनादेखील सांगत नाहीत. टोळक्यांवर कारवाई करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी काही उपाययोजना केल्या आहेत. शाळांनीदेखील आवारात तसेच प्रवेशद्वाराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे. या बाबत पुणे जिल्हय़ातील सर्व शाळांमध्ये जाऊन ग्रामीण पोलीस सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन करणार आहेत. येत्या तीन महिन्यांत जिल्हय़ातील सर्व शाळांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. पोलिसांनी दिलेल्या सूचनेचे पालन न केल्यास शाळांविरुद्ध रीतसर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले.

शाळांनी कॅमेरे चांगल्या दर्जाचे बसवावेत जेणेकरून चित्रीकरण सुस्पष्ट येईल. कॅमेरे बसविल्यामुळे शाळांबाहेर थांबणाऱ्या टोळक्यांवर कारवाई करणे शक्य होईल तसेच त्यांच्यावर जरबदेखील बसेल. शाळांना सूचना देण्याबरोबरच पोलिसांनी छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. पौड, लोणावळा, बारामती, खेड, जुन्नर, भोर, देहूरोड, हवेली या विभागांतील शैक्षणिक संकुलात गस्त घालण्यात येणार आहे. ग्रामीण पोलिसांच्या निर्भया पथकाची संख्या सध्या आठ आहे. निर्भया पथकात महिला पोलीस, अधिकाऱ्यांचा समावेश आहे. निर्भया पथकाची संख्या वाढविण्यात येणार आहे. निर्भया पथकाला छुपे कॅमेरे देण्यात येणार आहेत. शाळांबाहेर थांबलेल्या टोळक्यांचे छुप्या कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. छेडछाडीच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुले असतात. सुरुवातीला अल्पवयीन मुलांच्या पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज देण्यात येईल. अशा मुलांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. त्यानंतर छेडछाड केल्यास अशी मुले आणि तरुणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील. ज्या तरुणांविरुद्ध विनयभंगाचे दोन गुन्हे दाखल होतील त्यांना पुणे शहर आणि जिल्हय़ातून तडीपार करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.

छेडछाड करणाऱ्या १८०० मुलांचे समुपदेशन

यंदाच्या वर्षी ग्रामीण पोलिसांनी छेडछाडीच्या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या १८०० मुलांचे समुपदेशन केले आहे. काही मुले तसेच तरुणांचे समुपदेशन करूनही त्यांच्यात सुधारणा न झाल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस काका आणि काकी

पुणे शहर पोलिसांकडून शालेय विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पोलीस काका योजना सुरू केली आहे. त्याप्रमाणे ग्रामीण पोलिसांकडून पोलीस काका आणि पोलीस काकी ही योजना सुरू करण्यात येणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना पोलिसांचे मोबाइल क्रमांक देण्यात येतील. विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या अडचणी तसेच छेडछाडीच्या घटनांची माहिती ते पोलिसांना देऊ शकतील. प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी बसविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.