News Flash

सीसीटीव्ही कॅमेरे योजना; खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती नाही

दोन्ही शहरांमध्ये मिळून ४४० ठिकाणी १,२०५ सीसी टीव्ही कॅमेरे या योजनेत बसवले जातील. त्यासाठी शहरात सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर खोदाई सुरू करण्यात आली आहे.

| February 12, 2014 02:58 am

सीसीटीव्ही कॅमेरे योजना; खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती नाही

पुणे आणि पिंपरी शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना हाती घेण्यात आली असली, तरी या योजनेसाठी शहरभर खोदाई करण्यात आली असून जेथे केबल टाकण्याचे काम झाले आहे तेथे रस्ते बुजवणे, डांबरीकरण आदी आवश्यक कामे केली जात नसल्याचा प्रश्न स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी उपस्थित करण्यात आला. या प्रश्नी संबंधित ठेकेदाराला योग्य ते आदेश दिले जातील, असे आश्वासन आयुक्तांनी या वेळी दिले.
राज्य शासन आणि पुणे व पिंपरी महापालिकांच्या संयुक्त निधीतून दोन्ही शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दोन्ही शहरांमध्ये मिळून ४४० ठिकाणी १,२०५ सीसी टीव्ही कॅमेरे या योजनेत बसवले जातील. त्यासाठी शहरात सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर खोदाई सुरू करण्यात आली आहे. या खोदाईच्या प्रश्नाबाबत स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी हेमंत रासने यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. ज्या रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे व जेथे केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे अशा ठिकाणी रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवणे, तसेच खोदाई केलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण, राडारोडा उचलणे आदी कामे संबंधित ठेकेदाराकडून केली जात नसल्याची तक्रार रासने यांनी या वेळी केली.
हे रस्ते खोदताना अनेक ठिकाणी ठेकेदाराकडून जी यंत्रं वापरली जात आहेत त्यामुळे वीजवाहक केबल तुटल्या असून अनेक ठिकाणी जलवाहिन्याही तुटल्या आहेत. मात्र दुरुस्तीबाबत कोणतीही उपाययोजना होत नसल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी येत आहेत, याकडेही लक्ष वेधण्यात आले. पथ विभागाचे अधिकारी या प्रश्नांवर उत्तरे देऊ शकले नाहीत. अखेर आयुक्त विकास देशमुख यांनी केबल टाकण्याचे काम ज्या ठेकेदारामार्फत केले जात आहे, त्यांना बोलावून चर्चा केली जाईल. तसेच रस्ते दुरुस्तीबाबतही योग्य ते आदेश दिले जातील, असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2014 2:58 am

Web Title: cctv digging commissioner
टॅग : Cctv,Commissioner
Next Stories
1 नाटय़गृहातील गैरसोयींकडे लक्ष वेधण्यासाठी ‘बालगंधर्व’च्या दारात रंगकर्मीचे आंदोलन
2 कलाछाया संस्थेतर्फे ‘कथक गंगासागर’चे आयोजन –
3 नव्या आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिला कानमंत्र
Just Now!
X