पुण्यात सध्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चर्चा सुरू असून, दुकाने, खासगी सोसायटय़ांमध्येही असे कॅमेरे बसविण्यात येत आहेत. आता पुण्यात हे कॅमेरे भाडय़ाने मिळू लागले आहेत. विशेष म्हणजे कंपनीच कॅमेरे बसवून देणार. कॅमेऱ्यांची देखभाल, मॉनिटर, हार्ड डिस्क यांची जबाबदारीही घेणार.. आपण फक्त प्रत्येक महिन्याला कंपनीने दिलेल्या सेवेचे पैसे भरायचे.
मोठय़ा सोसायटय़ांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. मात्र, लहान सोसायटय़ांना कॅमेरे विकत घेऊन बसवणे परवडत नाही. ते विकत घेऊन बसवण्यासाठी काही लाखांमध्ये खर्च येतो. तसेच कॅमेरे सोसायटीच्या मालकीचे असले, तर त्यांच्या देखभालीचा खर्चही सोसायटीलाच पेलावा लागतो. त्याशिवाय वायरिंगचा खर्च निराळा. त्यामुळेच पुण्यातील अनेक सोसायटय़ा भाडेतत्त्वावर सीसीटीव्ही या पयार्याचा विचार करताना दिसत आहे. याबाबत माणिकबागेतील सुंदर गार्डन सहकारी गृहरचना संस्था मर्यादितचे राजेंद्र पिटके यांनी सांगितले, ‘आमच्या सोसायटीमध्ये या महिन्यातच सहा इमारतींसाठी सीसीटीव्ही बसवले आहेत. ते विकत घेऊन बसवायचे झाले तर सुमारे २ लाख ५० हजार रुपये खर्च आला असता. म्हणून आम्ही हा पर्याय विचारात घेतला. यासाठी आम्हाला फक्त केबलिंगसाठी खर्च करावा लागला. दर महिन्याला प्रत्येक इमारतीला केवळ ६५० रुपये भाडे भरावे लागणार आहे.’
‘झायकॉम’ या कंपनीतर्फे सामाजिक आंतरदायित्वाचा (सीएसआर) भाग म्हणून ‘सिक्युरिटी अॅज अ सव्र्हिस’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या अंतर्गत सोसायटय़ांमध्ये कंपनी कॅमेरे बसवून देते. त्या कॅमेऱ्यांची, त्यांच्या बरोबर असलेला मॉनिटर, डीव्हीडी आदींची मालकीही कंपनीचीच. सोसायटय़ांना सुरवातीला कॅमेरे बसवताना येणारा वायरिंगचा खर्च सोडला, तर वेगळा मोठा खर्च करण्याची गरज नाही. नंतर महिन्याचे भाडे फक्त द्यावे लागते. सोसायटय़ांचा आकार आणि कॅमेऱ्यांची संख्या यावर हा दर अवलंबून असेल. पण साधारण दोन हजार रुपये ते पाच हजार रुपये एवढय़ा कमी पैशांमध्ये सोसायटय़ांना आपली सुरक्षितता वाढवता येऊ शकते. दोन वर्षांनंतर त्याची रक्कमही १५ ते २० टक्क्य़ांनी कमी होते. ‘कंपनीने सेवा देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. आमचे २४ तास सेवा देणारे कॉल सेंटरही आहे. कॅमेरा आणि इतर गोष्टींच्या बाबतीत काही अडचण आली, तर आम्ही २४ तास सेवा पुरवतो. तसेच एखादा गुन्हा घडलाच, तर पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्यासाठी आमचा अभियंता असेल.’ अशी माहिती झायकॉमचे क्षेत्रीय व्यवस्थापन अमित गावडे यांनी दिली.