पुण्यातील गुरुवार पेठ परिसरात असलेल्या श्री आदेश्वर महाराज मंदिर ट्रस्टच्या एका मंदिरातून दोन चोरट्यांनी दानपेटीसह, जवळपास एक लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. मंदिरातील चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तेजपाल गोटीवाला (वय ५१) यांनी या प्रकरणी खडक पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार पेठेतील श्री आदेश्वर महाराज मंदिर ट्रस्टच्या गोटीवालाधडा या मंदिरामधील नाकोडा भैरव जैन मंदिरात रविवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून दोन चोरटे मंदिर परिसरात आले. त्या दोघांनी मंदिराच्या दरवाजावर लाथा मारून, दरवाजाचे कडी कोयंडा तोडला. त्यानंतर एक जण आतमध्ये जाऊन, पाच किलो वजनाची लाकडी आणि त्याभोवती चांदीचा पत्र असलेली दान पेटी बाहेर घेऊन आला. या दानपेटीमध्ये अंदाजे तीन हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही चोरट्यांनी ही दानपेटी पळवून नेल्याची घटना घडली आहे. तर या घटनेचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.