करोना अजूनही पूर्णपणे गेलेला नसल्याने आपल्या सर्वांना सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे लागतील. त्यामुळे यंदाची शिवजयंतीही साधेपणाने साजरी करण्यात यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

आणखी वाचा- धनंजय मुंडे प्रकरणावर अजित पवारांचं रोखठोक मत, म्हणाले…

“गेल्या वर्षी मार्चपासून करोनाचं संकट आलं. त्यामुळे या काळात आलेले सर्व धर्मांचे सण-उत्सव साधेपणाने साजरे केले. यंदा १९ फेब्रुवारी रोजी असणारी शिवजयंतीही साधेपणाने साजरी करू, शासनाच्या आवाहनाला जनतेने नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, याही वेळेस तसा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे”, असं अजित पवार म्हणाले. तसेच, शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी गडावर राज्याचे प्रमुख अभिवादनासाठी येण्याची परंपरा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दिवशी अभिवादनासाठी शिवनेरीवर जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- “दादा, तुम्ही लस केव्हा घेणार?”; अजित पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर

शिवनेरी गडावर करण्यात येणारी विकासकामे दर्जेदार होतील, अशी दक्षता घेण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या. जिथे पुरातत्व विभाग, वन विभागाची परवानगी आवश्यक आहे तिथे परवानगी घेण्याची कार्यवाही करण्यात यावी, असेही ते म्हणाले.  पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे शिवजयंती उत्सव आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत खा‌सदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण उपस्थित होते.