News Flash

सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे सुरूच

सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे तातडीने थांबण्याचे आदेश देण्यात आले असले, तरी शहरात कोणत्याही भागात ही कामे थांबलेली नसल्याचे चित्र आहे.

शहरातील पाणीटंचाई आणि शहराला सुरू असलेला एक दिवसाआड पाणीपुरवठा लक्षात घेऊन सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांची कामे तातडीने थांबण्याचे आदेश देण्यात आले असले, तरी शहरात कोणत्याही भागात ही कामे थांबलेली नसल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी नव्याने डांबरी रस्ते खोदून सिमेंट रस्त्यांची कामे सुरू केली जात असल्याचेही दिसत आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेऊन शहरात गेल्या सप्टेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पाणीबचतीबाबत अनेक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने दिलेल्या आदेशानंतर शहरातील ३२५ जलतरण तलावही जूनअखेपर्यंत बंद ठेवले जाणार असून, त्यासंबंधीची कार्यवाहीदेखील महापालिकेतर्फे लवकरच केली जाणार आहे. शहरात महापालिकेचे २१ जलतरण तलाव असून, त्यांच्याबरोबरच इतर खासगी तलावही आता बंद केले जातील. शहरातील गाडय़ा धुण्याची केंद्रे, बांधकामे येथेही पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये असे आदेश यापूर्वीच महापालिका प्रशासनाने दिले आहेत. सध्या जे जलतरण तलाव सुरू आहेत तेथे बोअरवेलचे किंवा विहिरींचे पाणी वापरले जात आहे. या तलावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा वापर होत आहे का याची तपासणी करण्यासाठी भरारी पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत.
ही परिस्थिती लक्षात घेऊन शहरात गल्लीबोळांचे तसेच मोठय़ा रस्त्यांचे काँक्रिटीकरण जे फार मोठय़ा प्रमाणात शहरात सुरू आहे ते महापालिका प्रशासन थांबवणार का, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र प्रशासनाने त्याबाबतचे कोणतेही आदेश काढले नव्हते. ‘शहरातील असंख्य गल्लीबोळांमध्ये डांबरी रस्ते उखडून काँक्रिटीकरण सुरू आहे. सिमेंट रस्त्यांना पाणी फार मोठय़ा प्रमाणावर लागते. पाण्याची उधळपट्टीच या रस्त्यांवर सुरू असून हे चित्र तातडीने बदलणे आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याची परिस्थिती सुधारेपर्यंत सिमेंट रस्त्यांची कोणतीही नवी कामे हाती घेऊ नयेत’ अशी मागणी सजग नागरिक मंचतर्फे विवेक वेलणकर, विश्वास सहस्रबुद्धे आणि जुगल राठी यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. या मागणीनंतर जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी शहरात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत स्वयंसेवी संस्थांनी केलेली मागणी उचलून धरली. ही कामे थांबवण्याबाबत आदेशही देण्यात आले आहेत.
सिमेंट रस्त्यांसाठी पाण्याचा वापर मोठय़ा प्रमाणात सुरू असल्यामुळे त्यांची कामे थांबवण्याबाबत निर्णय घेण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात मात्र कामे थांबलेली नाहीत. अनेक ठिकाणी तर सिमेंट रस्ते करण्यासाठी नव्याने रस्ते खोदले जात असल्याचे चित्र आहे. शहरात फार मोठय़ा प्रमाणात ही कामे हाती घेण्यात आल्यामुळे आणि एकदा एखाद्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू झाल्यानंतर तो रस्ता महिना-दीड महिना वाहतुकीसाठी बंद ठेवला जात असल्यामुळे शहरात अनेक भागांत रोज वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. मात्र तरीही रस्त्यांची कामे जोरात सुरू आहेत. विशेषत: गल्लीबोळ आणि छोटे रस्ते सिमेंटचे करण्याचे प्रमाण मोठे आहे.
आयुक्तांच्या आदेशानुसार सिमेंट रस्त्यांची नवी कामे यापुढे सुरू होता कामा नयेत. त्याबाबत प्रशासनाने सतर्क राहून लक्ष ठेवण्याची गरज आहे. शिवाय, अनेक ठिकाणी पिण्याचे पाणीच वापरले जात आहे. अशा प्रकारांचीही दखल संबंधितांनी घेणे आवश्यक आहे.
विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2016 2:30 am

Web Title: cement road order stop work
Next Stories
1 राज्यमंडळ ‘व्हॉट्सअ‍ॅपग्रस्त’
2 टीईटीच्या फुटलेल्या परीक्षेचे नियोजन रखडलेलेच
3 जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी हिमायत बेगला जन्मठेप
Just Now!
X