सिमेंट रस्त्यांवर पाण्याचा निचरा होत नसल्याचे लक्षात आल्यामुळे पर्जन्यजल पुनर्भरण यंत्रणा (रेन वॉटर हार्वेस्टिंग) विकसित करण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागाचे नियोजन सुरू असतानाच क्षेत्रीय कार्यालयांकडून मात्र या नियोजनाला हरताळ फासला जात आहे. क्षेत्रीय कार्यालयांकडून अनेक प्रभागांमध्ये सिमेंटचे रस्ते करण्यासाठीची कामे हाती घेण्यात आली आहेत. ऐन पावसाळ्यात ही कामे सुरू होणार असून त्यामुळे नागरिकांनाही रस्ते खोदाईमुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे.

शहरातील सुस्थितीतील रस्त्यांची खोदाई करून ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा धडाका जानेवारी ते एप्रिल महिन्यात मोठय़ा प्रमाणावर दिसून आला होता. रस्ते सिमेंटचे करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत असतानाही हा प्रकार कायम राहिल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि महापालिकेवर जोरदार टीका करण्यात आली होती. महापालिकेच्या स्थायी समितीच्या माध्यमातून प्रभागांमधील प्रमुख रस्ते, उपरस्ते आणि अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे प्रस्ताव सध्या मान्य करण्यात आले आहेत. त्यानुसार किमान शंभर किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची खोदाई होणार असल्याचे स्पष्ट आहे. यातील बहुतांश कामे सध्या सुरू झाली आहेत. त्यातच आता क्षेत्रीय कार्यालयाने सिमेंटचे रस्ते करण्याचा धडाका कायम ठेवला आहे. त्यामुळे मध्यवर्ती भागात भर पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणावर रस्त्यांची खोदाई होणार असल्याचे चित्र पुढे येणार आहे.

शहरातील कसबा, सोमवार पेठ, नवी पेठ, पर्वती, खडकमाळ आळी, महात्मा फुले पेठ, कोरेगाव पार्क, घोरपडी, सहकारनगर, पद्मावती, मार्केटयार्ड, लोअर इंदिरानगर, अप्पर-सुप्पर इंदिरानगर या प्रभागात पावसाळापूर्व कामे करण्यासाठीची प्रक्रिया महापालिकेकडून जून महिन्यात सुरू करण्यात आली आहेत. त्याबाबतच्या कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून प्रत्यक्ष कामांना सुरुवात होण्यासाठी जुलै महिना उजाडणार आहे. एका बाजूला प्रभागात चेंबर दुरुस्ती, नालेसफाई, शहाबादी फरशी बसविणे, मॅनहोलमधील गाळ काढणे, भूमिगत सांडपाणी वाहिन्यांची दुरुस्ती करणे, आवश्यक ठिकाणी नव्याने सांडपाणी वाहिन्यांचे जाळे निर्माण करणे अशा कामांसाठी खोदाई होणार असतानाच त्यामध्ये सिमेंट रस्त्यांच्या कामांचीही भर पडणार आहे. या कामांसाठी तीन ते सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. कसबा-विश्रामबागवाडा आणि बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत या कामांसाठीची निविदा काढण्यात आली आहे.

सिमेंट रस्त्यांमुळे पाण्याचा निचरा होत नसल्याचे आणि पावसाळी गटारांसाठी जागा निर्माण करणे अडचणीचे ठरत असल्याचे चित्र आहे. पावसळ्याच्या कालावधीत त्याचे दृश्य परिणामही पुढे आले आहेत. त्यामुळे भूजल संवर्धनासाठी आणि पावसाचे पाणी नाल्यांच्या माध्यमातून थेट नदीपात्रात जाऊ नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्यासाठी धोरण हाती घेण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र त्यापूर्वीच सिमेंटचे रस्ते करण्याचा धडाका नगरसेवकांकडून आणि क्षेत्रीय कार्यालयांकडून कायम राहिला आहे.

खोदाईचे दिवस

शहरात समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत साठवणूक टाक्यांची उभारणी, जलवाहिन्या टाकण्याची कामे आणि पाण्याचे मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यानुसार नव्याने जलवाहिन्या टाकण्याची आणि जुन्या-जीर्ण जलवाहिन्यांच्या दुरुस्तीची कामे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून हाती घेण्यात आली आहेत. खराडी भागातून या कामांना प्रारंभ झाला आहे. आता टप्प्याटप्प्याने ही कामे पुढे सरकणार आहेत. त्यामुळे या कामांसाठी रस्ते खोदाईही मोठय़ा प्रमाणावर होणार आहे.