विद्युतदाहिनीकडे जाणारा रस्ता वगळता संपूर्ण परिसरातील रस्त्यांचे झालेले काँक्रिटीकरण.. दररोज व्यायाम आणि फिरण्यासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या बसण्याचा कट्टा जेसीबीने उखडल्याने नागरिकांची झालेली पंचाईत.. वाहनाच्या पार्किंगकरिता जागा उपलब्ध करण्यासाठी नष्ट करण्यात आलेल्या दोन चौरसाकृती बागा.. सुशोभीकरणाच्या नावाखाली वैकुंठ स्मशानभूमीचे खरोखरी स्मशान करण्यात आले आहे. 30vaikunth
एकेकाळी ओंकारेश्वर येथे असलेले स्मशान ५ एप्रिल १९७१ रोजी नवी पेठ येथील १७ एकर परिसरात स्थलांतरित करण्यात आले. तत्कालीन महापौर नामदेवराव मते आणि महापालिका आयुक्त केशव कृष्ण मोघे यांच्या उपस्थितीत वैकुंठ स्मशानभूमी असे नामकरण करण्यात आले. आशिया खंडातील सवरेत्कृष्ट स्मशानभूमी असा लौकिक संपादन केलेल्या या स्मशानभूमीच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेने सुमारे दोन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून, सध्या येथे विविध विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, ही कामे करताना नागरिकांच्या हिताचा विचार केला गेला नसल्याचेच दिसून आले असल्याचे वैकुंठ स्मशानभूमी येथे दररोज व्यायाम आणि फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सांगितले.
वैकुंठ स्मशानभूमी परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. मात्र, हे काम सुरू करताना आतील रस्त्यांचे काम आधी करण्यात आले. त्याचप्रमाणे स्मशानभूमीकडे जाणारे रस्तेदेखील सिमेंटचे करण्यात आले आहेत. पण स्मशानभूमीमध्ये प्रवेश केल्यानंतर ते विद्युतदाहिनी परिसरातील रस्ता हा निधी संपल्यामुळे तसाच ठेवण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी आल्यानंतर विधी पूर्ण होईपर्यंत नागरिक झाडाभोवतीच्या पारावर बसून राहतात. जेथून विधी पूर्ण झाल्याचे स्पष्टपणे दिसते अशा झाडाभोवतीचा पार नुकताच जेसीबी लावून उखडण्याचा करण्यात आलेला प्रयत्न हा नागरिकांनी विरोध केल्यामुळे फोल ठरला. हा कट्टा दोन दिवसांत बांधून देतो असे आश्वासन संबंधित ठेकेदाराने दिले होते. मात्र, तरीही हा कट्टा तसाच तुटलेल्या अवस्थेत आहे.
स्मशानभूमीत प्रवेश केल्यानंतर विद्युतदाहिनीकडे जाताना डावीकडे असलेल्या दोन चौरसाकृती बागा या जेसीबीने भुईसपाट करण्यात आल्या आहेत. या छोटेखानी बागांभोवतीच्या पारांचा नागरिक वापर करीत होते. मात्र, या बागा काढून तेथे वाहनांसाठी पार्किंग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. वास्तविक एस. एम. जोशी पुलाजवळ असलेल्या प्रवेशद्वारापाशी वाहनांसाठी मोठा वाहनतळ असताना या बागा उखडून तेथे वाहनतळ करण्याची आवश्यकता होती का, असा सवालही नागरिकांनी केला आहे. एकीकडे नागरिकांच्या सोयीसाठी विकासकामांचा बडेजाव करायचा आणि दुसरीकडे ही कामे करताना नागरिकांच्या हिताचा विचारही करायचा नाही हे धोरण असावे, असा उपरोधिक टोलाही काही ज्येष्ठ नागरिकांनी लगावला. सुशोभीकरणाच्या नावाखाली वैकुंठाचे खरोखरीच स्मशान करण्यात आले असल्याची टीकाही त्यांनी केली.