केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात शहराला पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान मिळविता आलेले नाही. पहिल्या दहा शहरांमध्ये पुण्याची निवड होईल. स्वच्छ सर्वेक्षणात शहाराने चांगले गुण प्राप्त केले होते, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. शहर पहिल्या दहा क्रमांकामध्ये स्थान मिळवेलही, पण कुठे आहे स्वच्छ-सुंदर शहर असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

शहरातील कुठल्याही प्रमुख चौकात किंवा गल्लीबोळात गेल्यास अस्ताव्यस्त पडलेला कचरा, फुटक्या-तुटक्या कचराकुंडय़ा, राडय़ारोडय़ाचे ढीगच्या ढीग, अस्वच्छ नदीपात्र, स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि त्यांची कमतरता, सार्वजनिक इमारती आणि कार्यालयांमधील कमालीची अस्वच्छता, भिंतींवर पिचकाऱ्या, शहरात फिरणारी भटक्या श्वानांची टोळी असे चित्र नेहमी दिसून येते. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या शहरातील परिस्थिती नेमकी कशी आहे, याकडे लक्ष न देता शहर स्वच्छतेचा दावा केला जात आहे, ही वस्तुस्थिती नाकारली जाते. देशातील अन्य शहरांपेक्षा पुणे स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये पुढे आहे, असेही सांगितले जाते. पण स्वच्छ सर्वेक्षणातून महापालिकेचा हा दावा फोल ठरला आहे. त्यामुळे शहर केवळ कागदोपत्रीच स्वच्छ ठरले असल्याचे दिसून येते.

शहर स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरुवात झाली. गेल्या तीन वर्षांपासून देशातील प्रमुख शहरांतील स्वच्छतेचे केंद्रीय पातळीवरील पथकाकडून सर्वेक्षण केले जाते. गेल्या तीन वर्षांपासून पुणे महापालिकाही या अभियानात आणि सर्वेक्षणात हिरिरीने सहभाग नोंदवित आहे. सर्वेक्षण होणार म्हटले की, प्रशासनाची जोरदार धावपळ सुरू होते.  आदेश, परिपत्रके काढून विविध आस्थापना, रस्ते, उपरस्ते, कार्यालये स्वच्छ ठेवण्याबरोबरच अनधिकृत होर्डिग्ज, फलक, कापडी फलक, झेंडे काढून टाकणे आणि पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याचे, शहरातील गल्लीबोळात, चौकात पडलेला कचरा उचलण्याची मोहीम तत्काळ सुरू होते. त्यातल्या त्यात एखादाा स्वच्छ प्रभाग आणखी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. एका प्रभागावरून शहर किती स्वच्छ आहे, याचे सादरीकरण पथकाच्या सदस्यांना केले जाते आणि सर्वेक्षण संपले की शहराची वाटचाल पुन्हा अस्वच्छतेकडे सुरू होते. यावेळीही तसाच प्रकार झाल्याचे दिसते.

शहरातील कुठल्याही प्रमुख चौकात किंवा गल्लीबोळात गेल्यास अस्ताव्यस्त पडलेला कचरा, फुटक्या-तुटक्या कचराकुंडय़ा, राडय़ारोडय़ाचे ढीगच्या ढीग, अस्वच्छ नदीपात्र, स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि त्यांची कमतरता, सार्वजनिक इमारती आणि कार्यालयांमध्ये जाणवत असलेली अस्वच्छता, भिंतींवर उमटलेल्या पिचकाऱ्या, शहरात फिरणारी भटक्या श्वानांची टोळी हे चित्र नेहमी दिसते. तसे नसते तर मोकाट श्वानांची समस्या उद्भवलीच नसती.  नागरिकांचा प्रशासनातील सहभाग वाढविण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महापौर आपल्या दारी हा उपक्रम महापौर मुक्ता टिळक यांनी राबविला. त्यामध्येही मोकाट श्वानांच्या हल्ल्याचा मुद्दा सातत्याने उपस्थित करण्यात आला. ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांच्यावरही मोकाट श्वानांनी हल्ला केल्यानंतर हा प्रश्न ऐरणीवर आला पण दिशाभूल करणारी आकडेवारी प्रशासनाकडून दाखविणे सुरू झाल्याचे दिसून आले.

शहर स्वच्छता अभियानात केवळ घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे आणि त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे एवढीच बाब अपेक्षित नाही. अवघ्या दोन ते तीन महिन्यांसाठी शहर स्वच्छ असण्यापेक्षा वर्षभर ते कसे स्वच्छ राहील यासाठी प्रयत्न होणे, लोकसहभाग वाढविणे हा खरा अभियानाचा मुख्य उद्देश आहे. पण तोच साध्य झाल्याचे तीन वर्षांत एकदाही दिसले नाही. उलट अभियान आले की सादरीकरण, कागदोपत्री उपाययोजना, नवे नियम, उपविधी तयार करण्याची हालचाल होते. त्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणातील पुण्याचे मानांकन घसरत आहे. ही बाब वेळीच लक्षात घेऊन शहर कायमस्वरूपी स्वच्छ राहण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

काँग्रेसकडून निवडणुकीची तयारी सुरू

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसकडून मेळाव्यांना प्रारंभ झाला आहे. विधानसभा मतदार संघनिहाय हे मेळावे होणार आहेत. या मेळाव्यांना कार्यकर्त्यांचा मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेता काँग्रेसमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. कसबा विधानसभा मतदारसंघापासून सुरू झालेल्या या मेळाव्याच्या निमित्ताने पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी एकत्र येण्याचा निर्धार कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्ता हाच महत्त्वाचा घटक ठरणार असल्यामुळे बूथ रचना सक्षमीकरणावरही भर देण्यात आला आहे. एक बूथ टेन युथ या संकल्पनेनुसार पक्ष पातळीवर काम सुरू झाले आहे. बूथ रचना आणि तिचे सक्षमीकरण यावर यापुढील काळात काँग्रेस पक्षाकडून भर देण्यात येणार आहे. पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितला आहे. लोकसभेच्या या जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार का, जागा कोणाकडे जाणार, याबाबत दावे-प्रतिदावे सुरू आहेत. या परिस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे.

भाजपचे आमदार आपल्या दारी

नागरिकांचा प्रशासनातील सहभाग वाढावा या उद्देशाने महापौर आपल्या दारी या उपक्रमाला प्रारंभ झाला. या उपक्रमाला मिळत असलेल्या प्रतिसादानंतर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार जगदीश मुळीक यांनीही मतदारसंघात या उपक्रमाला प्रारंभ केला आहे. या उपक्रमातून आगामी निवडणुकीच्या प्रचाराची अनौपचारिक सुरुवात त्यांनी केली आहे. मतदारांशी संपर्क साधणे, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला आठही मतदारसंघात घवघवीत यश मिळाले. त्यानंतर मात्र शहरातील दोन मतदारसंघ धोक्यात असल्याची चर्चा सातत्याने होत आहे. त्यामुळे या उपक्रमातून मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आगामी निवडणूक हेच त्याचे प्रमुख कारण आहे.

avinash.kavthekar@expressindia.com