कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील अतिवृष्टी आणि धरणांमधून मोठय़ा प्रमाणात करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे झालेल्या जीवित आणि आर्थिक नुकसानीचा आढावा केंद्रीय पथकाने गुरुवारी घेतला. राज्याचे मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी या पथकासमोर सादरीकरण करून नुकसानाची माहिती दिली.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या धोरण आणि नियोजनाचे सहसचिव डॉ. थिरुपुगाज यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथक पाहणी दौऱ्यावर आले आहे. विभागीय आयुक्तालयात संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या पथकात चित्तरंजन दास, आर. पी. सिंग, व्ही. पी. राजवेदी, मिलिंद पनपाटील, संजय जैस्वाल, ओमकिशोर या केंद्रीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

हे पथक पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्य़ांची दोन दिवस पाहणी करून शनिवारी (३१ ऑगस्ट) कोकण विभागात जाणार आहे.

‘यंदा मोसमी पावसाचे राज्यात उशिरा आगमन झाले. पुरामुळे बाधित झालेल्या राज्यातील सात लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. या बाधितांची एक हजारहून अधिक शिबिरात व्यवस्था करण्यात आली. बाधित ग्रामीण कुटुंबाला प्रत्येकी १० हजार, तर शहरी कुटुंबांना १५ हजार रुपयाचे वाटप करण्यात आले,’ अशी माहिती निंबाळकर यांनी केंद्रीय पथकाला या वेळी दिली.

पुणे विभागातील ५८ पैकी ३८ तालुक्यांना पूर आणि अतिवृष्टीचा फटका बसला. या आपत्तीत ६० लोकांचा मृत्यू झाला असून, सांगली, कोल्हापूर जिल्ह्य़ांचे सर्वाधिक नुकसान झाले. या दोन्ही जिल्ह्य़ांत बागायती क्षेत्र अधिक असल्याने पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. कोकण विभागातील नुकसानीची माहिती कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी या वेळी दिली.