आईच्या दुधाला पर्याय नसल्याने प्रत्येक जिल्ह्य़ामध्ये मातृदूध पेढय़ा सुरू करण्यासाठी केंद्र शासन व आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. या पेढय़ांसाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून मार्गदर्शक तत्त्वे व नियमावली तयार केली जाईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी शनिवारी दिली.
पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय व नेटवर्क ऑफ ह्य़ूमन मिल्क बँक्स (एनएचएमबी) यांच्या वतीने ‘मिल्क बँकिंग इन इंडिया २०१५’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते. गृहराज्यमंत्री राम शिंदे, खासदार अनिल शिरोळे, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील, सचिव सोमनाथ पाटील, कुलगुरू पी. एन. राजदान, युरोपीयन मिल्क बँकिंग असोसिएशनचे अध्यक्षा गिल्लीअन वीवर, ‘विज्ञानभारती’चे जयंत सहस्रबुद्धे आदी त्या वेळी उपस्थित होते.
नड्डा म्हणाले,की पाण्याप्रमाणेच मातेच्या दुधाला पर्याय नाही. त्यामुळे जिल्ह्य़ातच नव्हे, तर प्रत्येक गावामध्ये मातृ दूध पेढय़ांची गरज निर्माण झाली आहे. मातेच्या दुधाची बाळाला असणारी गरज लक्षात घेऊन अशा दूध पेढय़ा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मातृ दूध पेढी ही एक चळवळ होणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, मातृ दूध पेढीचे जाळे निर्माण झाल्यास नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण घटविणे शक्य आहे. त्यादृष्टीने वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ही परिषद पहिले पाऊल ठरणार आहे.
परिषदेच्या दुसऱ्या सत्रामध्ये ‘एनएचएमबी’चे संस्थापक सदस्य यांचे ‘मातृ दूध दाता व लाभार्थी’ या विषयावर व्याख्यान झाले. ते म्हणाले, मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात असतानाच स्तनपान किंवा दान केलेले मातृ दूध उपलब्ध झाल्यास ते बालक सुदृढ होते. अशा बालकांचा तीन व आठव्या वर्षी मोजलेला बुद्धय़ांक वाढल्याचेही वैद्यकीय निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.
केईएम रुग्णालयाच्या डॉ. अमृता देसाई म्हणाल्या,‘‘सध्या आपल्या देशात स्तनपानाचे प्रमाण ५० टक्क्य़ांहून कमी आहे. म्हणजे निम्म्याच मुलांना मातेचे दूध मिळते. हे प्रमाण वाढविण्यासाठी मातृ दूध पेढय़ांचा उपयोग होऊ शकणार आहे.’’