औषधनिर्मितीसाठीची मूलभूत सुविधा उपलब्ध

पुणे : औषधनिर्मितीमध्ये महत्त्वाच्या ठरणाऱ्या रेणूंच्या आवश्यक चाचण्यांची सुविधा सेंटर फॉर बायोफार्मा अ‍ॅनालिसिस (सीबीए) या अत्याधुनिक प्रयोगशाळेच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. जैवतंत्रज्ञान विभागाच्या नॅशनल बायोफार्मा मिशनअंतर्गत ही अत्याधुनिक प्रयोगशाळा पुण्यात सुरू करण्यात आली असून, या प्रयोगशाळेमुळे औषधनिर्मिती क्षेत्रातील राज्यभरातील संशोधक, नवउद्यमी यांना चाचण्यांची सुविधा प्राप्त होणार आहे.

सेंटर फॉर बायोफार्मा अ‍ॅनालिसिसच्या डॉ. स्मिता काळे यांनी या प्रयोगशाळेविषयीची माहिती दिली. के ंद्र सरकारकडून बायोफार्मा मिशनअंतर्गत राज्यातील ही पहिली प्रयोगशाळा आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या व्हेंटर सेंटरअंतर्गत ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ. रेणू स्वरूप यांच्या हस्ते नुकतेच या प्रयोगशाळेचे उद्घाटन झाले. मोठय़ा औषधनिर्मिती कं पन्यांमध्ये चाचण्यांसाठी अशी सुविधा आहे. मात्र, सरकारच्या अनुदानातून स्थापन झालेल्या या प्रयोगशाळेत चाचण्यांसाठीची अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आतापर्यंत संशोधकांना त्यांच्या संशोधनाच्या चाचण्या परदेशातून करून घ्याव्या लागत होत्या. त्यासाठी मोठा खर्च करावा लागत होता, वेळही द्यावा लागत होता. मात्र, आता पुण्यातच ही प्रयोगशाळा स्थापन झाल्याने कमी खर्चात आणि कमी वेळात चाचण्या करणे शक्य होईल. औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन होत असले, तरी चाचण्यांसाठीची आवश्यक प्रक्रिया होत नाही. त्यामुळे संशोधनपत्रिके त शोधनिबंध प्रसिद्ध होऊन संशोधन तिथेच थांबते. परिणामी संशोधनाचे व्यावसायिकीकरण होऊ शकत नाही. आता या प्रयोगशाळेमुळे चाचण्यांची सुविधा स्थानिक पातळीवरच निर्माण झाल्याने संशोधक, नवउद्यमी, उद्योगक्षेत्रातील कं पन्यांना परदेशातील चाचण्यांसाठी येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत कमी खर्चात चाचण्या करून घेता येतील, असे डॉ. काळे यांनी सांगितले. प्रयोगशाळेत एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.

नवउद्यमींना संधी

औषधनिर्मिती, संबंधित संशोधन क्षेत्रात अद्याप नवउद्यमींचे प्रमाण कमी आहे. आता या प्रयोगशाळेमुळे नवउद्यमींना अनेक संधी निर्माण होऊ शकतात, असेही डॉ. काळे यांनी नमूद केले.