पुणे : केंद्र सरकारचे लसीकरण धोरण चुकीचे आहे. लसीकरणाच्या नियोजनात गैरप्रकार होत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे के ला. या सर्व प्रकारची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी के ली.

केंद्रातील मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी हा आरोप के ला. शहाराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवकर, अ‍ॅड. अभय छाजेड यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

देशातील नागरिकांना लस कमी दरात उपलब्ध व्हावी, यासाठी लशीची मोठय़ा प्रमाणावर खरेदी होणे अपेक्षित होते. मात्र केंद्र सरकारचे लसीकरण धोरण चुकीचे असून नियोजनातही गैरप्रकार झाले आहेत, असे सांगून चव्हाण म्हणाले की, शहिदांच्या नावाने मते मागून सत्तेमध्ये आलेल्या मोदी सरकारने विखारी राष्ट्रवाद आणि अल्पसंख्यांकांबाबत द्वेषाचे धोरण अवलंबले आहे. करोना संसर्गाच्या काळात नियोजनशून्य कारभारामुळे देशाची अवस्था वाईट झाली आहे. नोटबंदीचा निर्णय आणि वस्तू तसेच सेवा कर विधेयकाच्या (जीएसटी) चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या अंमलबजावणीमुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळत आहे. करोना काळात एप्रिल ते जून या कालावधीत देशाचा आर्थिक विकास दर उणे २४ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याचे स्पष्ट झाले आहे.

विमानतळे, बंदरे, रेल्वे, बँका अशा सरकारी आस्थापना विक्रीला काढण्याचा घाट घातला जात आहे. करोना कालावधीत वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी पेट्रोल, डिझेलची दरवाढ के ली जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या कि मती कमी झाल्या असतानाही दर वाढविले जात आहेत, असा आरोपही चव्हाण यांनी के ला.