अर्जात ८० हजारांनी वाढ; औषधनिर्माणशास्त्राकडे वाढता ओढा

तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (सीईटी) आलेल्या अर्जात या वर्षी जवळपास ८० हजारांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे यंदा अर्ज भरणाऱ्यांमध्ये ९ तृतीयपंथी (थर्ड जेंडर) विद्यार्थी आहेत. या वर्षी ३ लाख ६० हजार अर्ज परीक्षेसाठी आले आहेत.

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांचे प्रवेश राज्यस्तरावरील सामाईक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून (सीईटी) करण्यात येतात. गेल्या काही वर्षांपासून औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढतो आहे. मात्र त्याच वेळी अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. असे असताना या वर्षी मात्र या परीक्षेसाठी आलेल्या अर्जात साधारण ८० हजारांची वाढ झाल्याचे दिसत आहे.

त्याचप्रमाणे या वर्षी तृतीयपंथी विद्यार्थ्यांनीही या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. केंद्र शासन आणि सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा अर्जात विद्यार्थ्यांचे लिंग लिहिताना स्त्री, पुरुष यांच्याबरोबर इतर असा पर्यायही उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा पर्याय गेल्यावर्षीपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. गेल्या वर्षी त्याला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र या वर्षी परीक्षा अर्जात नऊ विद्यार्थ्यांनी इतर हा पर्याय निवडला आहे.

राज्यभरात ११ मे रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी यंदा ३ लाख ६३ हजार ४१३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. गेल्या वर्षी या परीक्षेसाठी साधारण २ लाख ८० हजार अर्ज आले होते, अशी माहिती तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक दयानंद मेश्राम यांनी दिली. या परीक्षेसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे दोन विषय बंधनकारक असतात. गणित किंवा जीवशात्र या पैकी एक किंवा दोन्ही विषय घेऊन परीक्षा देता येते. यामध्ये १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी गणित हा पर्यायी विषय निवडला आहे, तर ८७ हजार ७५४ विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र हा विषय निवडला आहे. दोन्ही विषयांची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १ लाख ३९ हजार ७७० आहे.

अर्जाची पडताळणी कठीण..

‘आतापर्यंत अर्जातील ‘अदर’ हा पर्याय निवडला जात नव्हता. मात्र यंदा असे अर्ज आले आहेत. मात्र त्याची पडताळणी करणे कठीण आहे. विद्यार्थ्यांकडून असा पर्याय चुकून निवडला गेला असेल, तर गोंधळ होऊ शकेल.’  दयानंद मेश्राम, सहसंचालक, तंत्रशिक्षण विभाग

विभागानुसार आलेले अर्ज

  • ’ पुणे – ८७ हजार ७४२
  • ’ मुंबई – ७३ हजार १८५
  • ’ नाशिक – ४४ हजार २००
  • ’ नागपूर – ४१ हजार ७७३
  • ’ सांगली – ३० हजार ९३८
  • औरंगाबाद – ३० हजार ६८९
  • अमरावती – ३० हजार ४२
  • नांदेड – २४ हजार ८३८