पीसीएममध्ये स्मित रामभिया, विजय मुंद्रा तर पीसीबीमध्ये अमेय माचवे प्रथम

राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) निकाल शनिवारी सायंकाळी जाहीर झाला आहे. या परीक्षेत ‘पीसीएम’ गटात मुंबईचा स्मित रामभिया आणि सोलापूरचा विजय मुंद्रा या परीक्षेत २०० पैकी १९७ गुण मिळवून राज्यात प्रथम आले आहेत. पीसीबी गटात सातारा येथील अमेय माचवे याने २०० पैकी १९० गुण मिळवून बाजी मारली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा गुणवत्तेत मात्र घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सामाईक प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येते. शनिवारी संध्याकाळी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यात सुमारे एक हजार ११० परीक्षा केंद्रांवर ११ मे रोजी परीक्षा घेण्यात आली होती. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) अशा दोन विषय गटांमध्ये ही परीक्षा घेण्यात येते. अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी पीसीएम गटाचे गुण पाहिले जातात. तर औषधनिर्माणशास्त्र आणि इतर काही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पीसीबी गटाला प्राधान्य दिले जाते.

यंदा या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तरी गुणवत्तेत घट झाल्याचे निरीक्षण तंत्रशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून नोंदवण्यात आले आहे. गेल्यावर्षी ५३ विद्यार्थ्यांना १९० पेक्षा अधिक गुण मिळाले होते, यंदा मात्र ही संख्या १० पर्यंत खाली आली आहे. शंभरपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्याही घटली असल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदवले आहे.

एकूण ३ लाख ७६ हजार २८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी एक लाख विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) गटात तर ९५ हजार ५५४ विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) गटात परीक्षा दिली.

तर, एक लाख ४९ हजार १६२ विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित (पीसीएमबी) गटात परीक्षा दिली होती. यापैकी पीसीएम गटात १५० अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २ हजार ८८९ आहे, तर पीसीबी गटात ५७३ आहे. शंभरपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी पीसीएम गटात २३ हजार ७८ आहेत, तर पीसीबी गटात १२ हजार ७१२ आहेत.

परीक्षेतील यशवंत

  • पीसीएम गटात पहिला – स्मित रामभिया, मुंबई आणि विजय मुंद्रा, सोलापूर (१९७ गुण)
  • पीसीबी गटात पहिला – अमेय माचवे, सातारा (१९०)
  • मागासवर्गीय प्रवर्ग (पीसीएम) – गजानन ऋषिकेश (१९० गुण)
  • मागासवर्गीय प्रवर्ग (पीसीबी) – गौरव कचोळे (१८७ गुण)
  • मुलींमध्ये प्रथम (पीसीएम) – प्राची मुनी (१८१ गुण)
  • मुलींमध्ये प्रथम (पीसीबी) – रेवती राघवन (१८७ गुण)

प्रवेश प्रक्रिया कशी असेल?

  • अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी ३७६ महाविद्यालयांमधील साधारण १ लाख ५१ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. प्रवेश परीक्षेला बसणारा प्रत्येक विद्यार्थी या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरतो. त्यानुसार २ लाख ८४ हजार विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
  • औषधनिर्माणशास्त्रासाठी १९१ महाविद्यालयांमध्ये १४ हजार २१० जागा उपलब्ध आहेत. त्या तुलनेने विद्यार्थिसंख्या जास्त असल्यामुळे या प्रवेशासाठी अधिक स्पर्धा असू शकेल.
  • अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (५ जून) सुरू होणार आहे.
  • यंदा खासगी महाविद्यालयांसाठी तीन प्रवेश फेऱ्या तर शासकीय महाविद्यालयांसाठी ४ प्रवेश फेऱ्या घेण्यात येतील.

निकाल कुठे पाहणार?

  • तंत्र शिक्षण संचालनालयाच्या (डिटीई) http://www.dtemaharashtra.gov.in/mhtcet2017 या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि जन्म दिनांक टाकू न निकाल पाहता येणार आहे.

संकेतस्थळाची रडकथा

  • प्रवेश परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात हा निकाल शनिवारी सायंकाळीच जाहीर करण्यात आला. मात्र अनेक विद्यार्थ्यांना निकाल पाहता आलाच नाही. तंत्रशिक्षण विभागाचे संकेतस्थळ सुरू होण्यास अडचणी येत असल्यामुळे निकाल पाहता आला नाही.