सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी एखादी महिला रस्त्याने पायी जात असते.. तिच्या मागील किंवा पुढील बाजूने एक दुचाकी येते.. दुचाकीवर बसलेल्या दोघांचा कुणाला संशय येत नाही.. महिलेच्या जवळ येताच दुचाकीचा वेग कमी होतो अन् काही कळायच्या आत दुचाकीवर मागे बसलेली व्यक्ती महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचते.. दुचाकीचा वेग वाढतो व कुणाला काही समजण्यापूर्वीच दुचाकीवरील चोरटे तेथून पसार होतात.. शहराच्या विविध भागात सध्या असे प्रकार सुरू झाले असून, रोजच विविध भागात सोनसाखळी चोरीचे गुन्हे नोंदविले जात आहेत.
मागील वर्षांमध्ये सोनसाखळी चोरटय़ांनी शहरात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. रोजच दोन ते तीन घटना शहराच्या विविध भागात घडत होत्या. त्याबाबत नागरिकांकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत होता. त्याचा परिणाम म्हणून पोलिसांनी सोनसाखळी चोरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. सोनसाखळी चोरीच्या घटना घडणाऱ्या भागामध्ये सकाळी व संध्याकाळी गस्त वाढविण्यात आली होती. त्याचप्रमाणे संशयित दुचाकीस्वारांना अडवून त्यांची चौकशीही केली जात होती. काही भागात साध्या वेशातील पोलीस महिलेकडून नकली दागिने घालून रस्त्यावर सापळाही लावण्यात येत होता. या विविध प्रकारांतून सोनसाखळी चोरीतील विविध गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले.
पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा परिणाम म्हणून नव्या वर्षांमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांना मोठय़ा प्रमाणावर आळा बसल्याचे दिसून आले. मात्र, या प्रकारातून पोलिसांचे लक्ष काहीसे दूर गेल्याचे दिसताच सोनसाखळी चोर आता पुन्हा सक्रिय झाल्याचे मागील आठवडय़ापासून घडणाऱ्या घटनांवरून दिसून येत आहे. २३ मार्चला एकाच दिवशी शहरात सोनसाखळी चोरीच्या सहा घटना घडल्या. कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन, तर डेक्कन, मुंढवा, हडपसर, सिंहगड रस्ता या पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक घटना घडली. या एकाच दिवशी चोरटय़ांनी अडीच लाख रुपयांचे दागिने लंपास केले. त्यानंतरही शहरात विविध भागात हे प्रकार सुरूच आहेत. २६ मार्चलाही कोथरूडबरोबरच बिबवेवाडी येथे महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचा प्रकार घडला. या दोनच घटनांमध्ये सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या सोनसाखळ्या चोरटय़ांनी पळविल्या.
सोनसाखळी चोरांकडून प्रामुख्याने ज्येष्ठ महिलांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे अनेक प्रकारांतून दिसून येत आहे. प्रामुख्याने सकाळी प्रभात फेरीसाठी बाहेर पडणाऱ्या किंवा संध्याकाळी फिरण्यासाठी पायी जाणाऱ्या महिलांबाबत असे प्रकार घडत आहेत. सोनसाखळी चोरीच्या घटना पुन्हा वाढल्याने पोलिसांनी तातडीने योग्य उपाययोजना करून या चोरटय़ांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.