महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षांचे औचित्य साधून दलित-परिवर्तनवादी चळवळींचे पाठीराखे आणि राज्यघटनेचे अभ्यासक असलेल्या डॉ. कसबे यांची अध्यक्षपदी निवड करून परिषदेने परिवर्तनाचे पाऊल टाकले आहे, अशी भावना कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी रविवारी व्यक्त केली.
परिषदेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीची पहिली बैठक रविवारी झाली. त्यामध्ये भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, माजी आमदार उल्हास पवार आणि माजी मंत्री यशवंतराव गडाख यांची परिषदेच्या विश्वस्तपदी तर, लोकसहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर, माजी आमदार निर्मला ठोकळ आणि ग्रहांकित मासिकाचे संपादक चंद्रकांत शेवाळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली, अशी माहिती प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या संपादकपदी डॉ. पुरुषोत्तम काळे यांची आणि सुरेश देशपांडे यांची सहायक संपादक म्हणून निवड करण्यात आली. पद्माकर कुलकर्णी आणि राजन लाखे यांच्याकडे विभागीय साहित्य संमेलनाच्या निमंत्रक आणि सहनिमंत्रकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून या समितीमध्ये विनोद कुलकर्णी आणि शशिकला पवार यांचा समावेश आहे. प्राचार्य तानसेन जगताप आणि विनोद कुलकर्णी यांची पुण्याबाहेरील कार्यवाह म्हणून निवड झाली आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली आहे. साहित्यिक योगदानाकडे दुर्लक्ष झालेल्या ‘अलक्षित सारस्वतां’चा मागोवा घेणारा खंड या विभागातर्फे प्रकाशित केला जाणार असल्याचे मिलिंद जोशी यांनी सांगितले. परिषदेच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्य़ामध्ये कार्यकारिणीच्या बैठका घेण्याबरोबरच जिल्हावार साहित्यिकांचे मेळावेही घेण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
साहित्य महामंडळावरील तीन सदस्यांची निवड
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य म्हणून मिलिंद जोशी आणि प्रकाश पायगुडे यांच्यासह रवींद्र बेडकिहाळ यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या घटनेनुसार कार्याध्यक्ष आणि प्रमुख कार्यवाह हे महामंडळाचे पदसिद्ध सदस्य असतात. तिसऱ्या जागेसाठी बेडकिहाळ यांची निवड करण्यात आली आहे. तीन वर्षे पुण्याबाहेरील आणि दोन वर्षे पुण्यातील कार्यकारिणीच्या सदस्याला संधी देण्यात येणार असल्याचे मििलद जोशी यांनी सांगितले.  

Sadabhau Khot on Devendra Fadnavis
“एकलव्याने एक अंगठा दिला होता, पण मी फडणवीसांसाठी दोन अंगठे द्यायला तयार”; सदाभाऊ खोत यांचे विधान
Uday Samant Nagpur
“रत्नागिरी – सिंधुदुर्गवर आमचाच हक्क” – उदय सामंत
Lok Sabha election
बच्‍चू कडू यांच्या खेळीने महायुतीसाठी डोकेदुखी वाढणार ?
Raj thackeray and amit shah meet
राज ठाकरे- अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं? अजित पवार गटातील नेत्याचं सूचक विधान; म्हणाले, “देवेंद्र फडणवीस…”