News Flash

चाकणमधील आगीत चार महिलांसह पाच जणांचा मृत्यू

गोदामात मोठय़ा प्रमाणावर कापूस असल्याने काही वेळातच आग फोफावली.

चाकणच्या नाणेकरवाडी येथील आगीत गुरुवारी कापसाचे गोदाम खाक झाले. या आगीत होरपळून चार महिलांसह पाच कामगारांचा मृत्यू झाला.

कापसाचे गोदाम खाक

चाकणच्या नाणेकरवाडी भागात कापसाच्या गोदामाला गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत चार महिलांसह पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. कारखान्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कल्पना विजय शिरसाठ (वय २९), राधा हरेश ठाकूर (वय २६), उज्ज्वला दिलीप सोनसाळे (वय ३५), कुसुम संदीप साखरकर (वय ३०), रामदास मराश्रम राठोड (वय ५२, सर्व रा. खराबवाडी, चाकण) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाणेकरवाडी येथे चाकण-तळेगाव रस्त्यावर रामदास मारुती कड यांच्या जागेत मोहंमद अरिफ अब्दूल कलाम खान यांचे सना एन्टरप्रायजेस या नावाने कापसाचे गोदाम आहे. या ठिकाणी खराब कापसावर प्रक्रिया करण्याचे काम केले जाते. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास गोदामाच्या एका भागात अचानक आग लागली. गोदामात मोठय़ा प्रमाणावर कापूस असल्याने काही वेळातच आग फोफावली. त्या वेळी गोदामात अनेक कामगार होते. आग व धुराने गोदाम पूर्णपणे भरून गेले. आगीतून जीव वाचविण्यासाठी कामगार बाहेर पडण्यासाठी धडपडत होते.

आगीचा प्रकार स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत अग्निशामक दलाला कळविण्यात आले. चाकण अग्निशामक दलासह बजाज, फोक्स व्ॉगन तसेच चाकण औद्योगिक वसाहतीतील बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पोलिसांच्या मदतीने अनेक कामगारांना बाहेर काढले.

चार महिला व एक पुरुष कामगार गोदामाच्या मागील भागात काम करीत होते. कापसाने आग काही क्षणातच पसरल्याने या कामगारांना तातडीने बाहेर पडता न आल्याने होरपळून त्यांचा मृत्यू झाला. दुपारी पाचही जणांचे मृतदेह अग्निशामनक दलाने गोदामाच्या बाहेर काढले.

चार तासांच्या प्रयत्नानंतर दुपारी दोनच्या सुमारास अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. स्थानिक नागरिकांनीही अग्निशामक दलाला पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले. आगीचे नेमके कारण अद्याप तरी समोर आले नसले, तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची पोलिसांकडूनही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 3:48 am

Web Title: chakan cotton godown fire
Next Stories
1 शाळकरी मुलीची छेड काढून भररस्त्यात कटरने वार
2 भंगार सामानात डासांचे अड्डे
3 भाजपमध्ये सरसकट सर्वाना प्रवेश नाही
Just Now!
X