24 October 2020

News Flash

प्रकल्प पूर्ण करण्याचे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांपुढे आव्हान

विधानसभा निवडणुकीचा निकाल गेल्या महिन्यात लागला. या निवडणुकीत शहरातील आठ मतदार संघांपैकी सहा मतदार संघात भाजपला विजय मिळाला.

 

समान पाणीपुरवठा, पार्किंग धोरणाची अंमलबजावणी, भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना, नदी सुधार योजना, चांदणी चौकातील उड्डाण पूल आणि कात्रज-कोंढवा रस्ता असे अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि योजना गेल्या चार ते पाच वर्षांपासून रखडल्या आहेत. महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही या कामांना गती देण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले असून पुढील अडीच वर्षांत ही कामे मार्गी न लागल्यास त्याचा फटका भाजपला आगामी महापालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही कामे मुदतीमध्ये पूर्ण करण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांपुढे उभे आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल गेल्या महिन्यात लागला. या निवडणुकीत शहरातील आठ मतदार संघांपैकी सहा मतदार संघात भाजपला विजय मिळाला. आठही जागा राखण्यात भाजपला अपयश आले. त्याचबरोबर तीन मतदार संघातील भाजप उमेदवारांना निसटता विजय मिळाला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. या पाश्र्वभूमीवर आता प्रकल्पांना गती देण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांपुढे आहे.

अडीच वर्षांपूर्वी भाजपला महापालिका निवडणुकीत मोठे यश मिळाले. तब्बल ९८ नगरसेवक, दोन खासदार, एक केंद्रीय मंत्री, राज्यात आणि केंद्रात सत्ता असे चित्र असतानाही सत्ताधाऱ्यांना अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि योजनांना गती देता आलेली नाही. बहुतांश प्रकल्प वाढीव खर्चामुळे वादग्रस्त ठरले असल्याचे दिसत आहे. योजनांबरोबरच अनेक धोरणेही कागदावरच राहिली असून त्याची काटेकोर अंमलबजावणीही भाजपला करावी लागणार आहे. वाहतूक, पाणीपुरवठा, घनकचरा अशा अनेक विभागातील महत्त्वांच्या प्रकल्पांना गती मिळालेली नाही.

शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी महापालिका प्रशासनाकडून पार्किंग धोरण हाती घेण्यात आले. मात्र या धोरणाअंतर्गत आकारण्यात येणाऱ्या शुल्कावरून वाद निर्माण झाला. त्यामुळे महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून सहा रस्त्यांवर प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्याचा निर्णय झाला. मात्र अद्यापही रस्ते निश्चित झालेले नाहीत. पीएमपीच्या ताफ्यात नव्या गाडय़ा आल्या असल्या, तरी त्या सेवेचा दर्जाही सुधारता आलेला नाही.

पाणीपुरवठय़ासंदर्भातही भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना आणि समान पाणीपुरवठा योजनेची कामे रखडली आहेत. समान पाणीपुरवठय़ाच्या कामांच्या निविदा वाढीव दराने आल्यानंतर त्यावरून मोठा वाद झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यात हस्तक्षेप करून फेरनिविदा काढण्याचे आदेश द्यावे लागले होते. भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेची कामेही मुदत संपत आली, तरी अपूर्णच आहेत. सध्या विस्कळीत पाणीपुरवठा होत असून पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे पूर्ण क्षमतेनेही भरली असतानाही सुरळीत पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. नदी सुधार योजनेअंतर्गतही मुळा-मुठा नदी संवर्धनाची कामे रखडली आहेत. त्यासाठी केंद्राकडून एक हजार कोटींचा निधी मिळाला आहे. मात्र कामांचा केवळ आराखडाच तयार झाला असून कामे सुरू होण्यास मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे हे प्रकल्प पुढील अडीच वर्षांत पूर्ण करावे लागणार आहेत. हे प्रकल्प पूर्ण करण्याचे आश्वासन भाजपने महापालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिले होते.

महत्त्वाकांक्षी कामे संथ गतीने

चांदणी चौकातील प्रस्तावित उड्डाण पुलासाठी केंद्र शासनाने निधी मंजूर केला आहे. दीड वर्षांपूर्वी भूमिपूजन होऊनही उड्डाण पुलाचे काम पुढे सरकले नाही.

कात्रज-कोंढवा रस्त्याबाबतही हाच प्रकार झाला आहे. या रस्त्याच्या कामाच्या निविदा चढय़ा दराने आल्यामुळे त्या रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आली होती. या फेरनिविदा मंजूर झाल्या असल्या, तरी कामे संथ गतीने सुरू आहेत.

शहर विकासाच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी योजना आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या दीड वर्षांत बहुतांश प्रकल्प आणि योजनांची कामे पूर्ण होतील, हा विश्वास आहे. सध्या काही प्रकल्पांची कामे सुरू झाली आहेत.

– मुक्ता टिळक, महापौर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 1:35 am

Web Title: challenge municipal authorities complete project akp 94
Next Stories
1 छाया हरोळीकर यांनी ‘वंदे मातरम्’ चित्रपटाच्या आठवणी जागवल्या
2 एल्गार परिषद प्रकरणात सहाजणांचे जामीन फेटाळले
3 वातावरणातील बदलामुळे गव्हाला कीड
Just Now!
X