विजेत्याला पाच लाखांचे पारितोषिक

पुणे : दूरचित्र संवादासाठी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) मोबाइलवर वापरता येईल, असे क्लाउड आधारित अ‍ॅप तयार करण्याचे आव्हान देशभरातील तंत्रज्ञ विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. स्वदेशी अ‍ॅप तयार करण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, विजेत्याला पाच लाखांचे पारितोषिक आणि आयआयटी रोपार येथे आंतरवासीयता (इंटर्नशिप) करण्याची संधी मिळणार आहे.

करोना विषाणू संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात घरातून काम करण्यासाठी ऑनलाइन यंत्रणांची गरज निर्माण झाली आहे. त्यात काही अ‍ॅप्लिके शन्सचा, संके तस्थळांचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, खास मोबाइलवर वापरता येण्याजोगे स्वदेशी अ‍ॅप तयार करण्याची स्पर्धा भारतीय शिक्षण मंडळ युवा आयाम, आयआयटी रोपार, रीसर्च फॉर रिसर्जन्स फाउंडेशन यांनी आयोजित के ली आहे. या स्पर्धेत प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ मे ही अंतिम मुदत आहे, तर अ‍ॅपचे बिटा प्रारूप ३१ मेपर्यंत सादर करावे लागणार आहे. या स्पर्धेत एकल, नवउद्यमी आणि संघ यांना सहभागी होता येईल.

किमान ५० पेक्षा अधिक मोबाइलधारकांना जोडून घेऊ शकणे, सव्‍‌र्हरची कमीत कमी गरज असलेले, ‘सेल्फ डेटा पुलिंग’ करणे, आयफोन, विंडोज आणि अँड्रॉइड अशा सर्व संचलन प्रणालींना पूरक हे अ‍ॅप तयार करण्यासाठीचे प्रमुख निकष असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, विजेत्यांना अ‍ॅप तयार करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य पुरवण्यात येणार आहे.  अधिक माहिती http://rfrfoundation.org/competitions  या दुव्यावर देण्यात आली आहे.