पिंपरी: राजकीय आशीर्वाद आणि भ्रष्टाचारामुळे फोफावलेली पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्याचे आव्हान नवे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासमोर आहे. शहरातील परिस्थिती समजून घेतल्यानंतर आपली कार्यपद्धती ठरवणार असल्याचे सांगत आपण राजकीय दबावाला भीक घालत नसल्याची गर्जना पोलीस आयुक्तांनी रुजू झाल्यानंतर केली आहे.

निर्धारित मुदत पूर्ण होण्यापूर्वीच संदीप बिष्णोई यांची पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यात, अवैध धंदे रोखण्यात बिष्णोई यांना अपयश आले. पोलीस दलात त्यांच्याविषयी खदखद होतीच, शहरातील प्रमुख राजकीय नेत्यांशी असलेले तीव्र मतभेद  त्यांच्या बदलीसाठी कारणीभूत ठरले.

शहरी-ग्रामीण अशा पद्धतीची मिश्र रचना असणाऱ्या शहरातील पोलीस आयुक्तालयाचा कारभार वेगवेगळ्या कारणांमुळे, वादांमुळे सतत चर्चेत राहणारे कृष्ण प्रकाश यांच्याकडे आला आहे.

वाढत चाललेली गुन्हेगारी हे शहराचे जुनेच दुखणे आहे. ही गुन्हेगारी रोखण्यासाठीच पिंपरी-चिंचवडला दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरू करण्यात आले. मात्र वाढतच राहिली. दोन वर्षांत जवळपास दोनशे खुनाच्या घटना घडल्या आहेत. बलात्काराच्या आणि आत्महत्यांच्या जवळपास ४०० घटना घडल्या आहेत. या शिवाय चोऱ्या,  दरोडे, हत्यारे बाळगणे, पिस्तूल सापडणे, एटीएम फोडणे, वाहनांची तोडफोड अशा गुन्ह्य़ांची संख्याही लक्षणीय आहे. िहजवडी, तळवडे, भोसरी, चाकण, तळेगाव असा मोठा औद्योगिक पट्टा असून तेथील प्रश्न वेगळेच आहेत. उद्योगनगरीतील सर्व गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याचे काम पोलीस आयुक्तांना करावे लागणार आहे.

मनुष्यबळ, अपुऱ्या वाहन समस्येची डोकेदुखी

पिंपरी पोलीस आयुक्तालयाची व्याप्ती मोठी आहे. त्या तुलनेत पोलीस कर्मचारी आणि वाहनांची संख्या खूपच अपुरी आहे. त्याचा परिणाम पोलिसांच्या कामगिरीवर होतो. आयुक्तालय सुरू झाल्यापासून या समस्या भेडसावतात. दोन वर्षांत दोन पोलीस आयुक्त झाले. त्या दोघांनाही या समस्या सोडवता आल्या नाहीत.

शहरातील सर्व प्रश्नांचा अभ्यास करून गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यात येईल.  कायद्यासमोर सर्वजण सारखेच असतील. अवैध धंद्यांना पाठिशी घालणार नाही. चुकीचे काम करणाऱ्या पोलिसांनाही शिक्षेला सामोरे जावे लागेल. राजकीय हस्तक्षेप चालणार नाही. कोणाच्याही दबावाखाली काम करण्याची सवय नाही.

– कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड