पुणे :  जागतिक तापमानवाढीसारख्या आव्हानात्मक काळात वास्तूरचनाकारांपुढील आव्हाने वाढली आहेत. त्यामुळे भविष्यात बांधकाम आराखड्यातच ऊर्जेचा कार्यक्षम वापर, कमी खर्चिक तंत्रज्ञान, नैसर्गिक आपत्तींना अनुसरून कल्पक, विधायक काम आवश्यक असल्याचा सूर तज्ज्ञांनी व्यक्त के ला.

डॉ. भानूबेन नानावटी वास्तुकला महाविद्यालय, (बीएनसीए) इंडियन नेटवर्क ऑन एथिक्स अॅण्ड क्लायमेट चेंज (आयएनईसीसी), लया संस्था यांच्यातर्फे  नुकत्याच झालेल्या चर्चासत्रात ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रियदर्शनी कर्वे, इन्फोसिसचे माजी उपाध्यक्ष आणि शाश्वत विकास सल्लागार रोहन पारीख आणि शहर विकास अभ्यासक वैष्णवी शंकर यांचा सहभाग होता. बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, प्रा. प्राजक्ता कुलकर्णी, पर्यावरणीय वास्तुकला विभाग प्रमुख डॉ. सजाता कर्वे, आयएनईसीसीचे मायरोन मेंडस आदी या वेळी उपस्थित होते.

इमारतीच्या आराखडा निर्मितीमध्ये वास्तूरचनाकारांनी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या सिमेंट, लोखंडासह ऊर्जा नियंत्रणावर लक्ष ठेवले पाहिजे. जगभरात शहरांमधील सधन लोकांकडून  उत्र्सजित होणाऱ्या हरित वायूचे शहरी आणि ग्रामीण भागातले गरीब लोक बळी ठरले आहेत. त्यामुळे हा विषय अधिक व्यापक परिप्रेक्ष्यातून सोडवायला हवा, असे डॉ. कर्वे यांनी सांगितले. रोगाच्या साथी, महापूर, वादळे, अतिवृष्टी, तापमानवाढ या नैसर्गिक संकटांच्या यादीतील पहिल्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश असल्याचे नमूद करून वादळे आणि महापूरापासून संरक्षण देणाऱ्या बांधकामांची गरज, ऊर्जा कार्यक्षम बांधकाम आराखड्यांची अपेक्षा वैष्णवी शंकर यांनी व्यक्त केली.