उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुढील काही दिवस राज्यात पाऊस पुन्हा जोर धरणार आहे. कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रातील घाटक्षेत्रात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. दरम्यान, बुधवारी (१९ ऑगस्ट) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला.

राज्याच्या बहुतांश भागांत ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच कमी-अधिक प्रमाणात पाऊस आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्रातील घाटक्षेत्र आणि कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे या भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नद्यांची पातळी धोक्यापर्यंत गेली होती. या काळात धरणांत मोठय़ा प्रमाणावर पाणीसाठा जमा झाला आहे. कोयना, चांदोली आणि वारणा धरणांतून मोठय़ा प्रमाणावर विसर्ग करण्यात आला. सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने पूरस्थिती निवळत आहे. धरणांतील विसर्गातही घट करण्यात आली आहे. मात्र, याच भागांत पुन्हा पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे.

बुधवारी राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. संध्याकाळी साडेपाचपर्यंत औरंगाबादमध्ये सर्वाधिक ३३ मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. गेल्या चोवीस तासांमध्ये घाटक्षेत्रातील ताम्हिणीत १९० मिलिमीटर, तर कोयनेत १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पर्जन्यभान..

* २० ऑगस्टला कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाडय़ात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता.

* २१ ऑगस्टला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज.

* २२ आणि २३ ऑगस्टला कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा.

* कोकण विभागातील ठाणे, पालघर. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत, तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्य़ांतील घाटक्षेत्रात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

* २० ते २३ ऑगस्टच्या कालावधीत किनारपट्टीवर सोसाटय़ाचा वारा वाहण्याचा अंदाज.

हिंगोली, नांदेडमध्ये पिकांचे नुकसान

मराठवाडय़ात आठवडय़ापासून पावसाचा जोर कायम आहे. या काळात हिंगोली, नांदेड जिल्ह्य़ात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बुधवारी औरंगाबाद शहरासह जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मराठवाडय़ातील जलसाठय़ातही चांगली वाढ होत असून, औरंगाबाद जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.