आणखी आठवडाभर तापमान चढेच

राज्यात ठिकठिकाणी शेतीला मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसत आहे. उत्तर प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, गेले काही दिवस खूप जास्त राहणारे तापमान आणि हवेतील वाढलेली आद्र्रता यामुळे तुरळक ठिकाणी वादळी वारे तयार होऊन पाऊस पडण्याच्या घटना घडत असून त्या या आठवडय़ात कायम राहण्याची शक्यता आहे.

‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’ने (आयएमडी) रविवारी सकाळी वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार सोमवारी व मंगळवारी (८ व ९ मे) दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकेल, तर ११ व १२ मे रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशपासून कर्नाटकपर्यंत सध्या कमी दाबाचे क्षेत्र (ट्रफ) तयार झाले आहे. मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रही या भागात येतो. शिवाय अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे (अँटीसायक्लोन) आद्र्रता मिळत आहे. गेले ३-४ दिवस राज्यात बऱ्याच ठिकाणी तापमान खूप जास्त होते. या सगळ्याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी वादळी वारे निर्माण होऊन पाऊस पडत आहे. अजून २-३ दिवस राज्यात तुरळक ठिकाणी या प्रकारचे वादळी वारे व पावसाची शक्यता आहे, असे ‘आयएमडी’चे शास्त्रज्ञ पी. सी. राव यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्रात वीज पडून दोन ठार

नाशिक : उत्तर महाराष्ट्रात रविवारी गारपीटसह वादळी पावसाने तडाखा दिला. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला.खेडगाव येथे पितांबर सूर्यवंशी (१८) तसेच पिलखोड येथील बबलू भिल (२२) यांचा वीज अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला.

कुटुंब दमलंय उन्हात..

देशभरातील तापमान रविवारी अंगाची काहिली करणारे होते. दुपारचा प्रवास करावा नकोसा वाटत असतानाही गाझियाबादमधील या कुटुंबाची अनिवार्य फिरस्तीत झालेली दैना.

तापभान

रविवारी राज्यात सर्वाधिक तापमान विदर्भात अकोला येथे (४५.१ अंश सेल्सिअस) होते. यवतमाळ (४४.५ अंश), गोंदिया (४२.८ अंश), नागपूर (४२.६ अंश), वर्धा (४२.५ अंश) बुलढाणा (४१.५ अंश) तसेच  परभणीत (४४ अंश), औरंगाबाद येथे ४१ अंश तापमान होते. जळगाव (४३.६ अंश), मालेगाव (४३ अंश), सोलापूर (४१.५ अंश) येथे चढे तापमान आहे.

काहिली कायम

सोमवारी व मंगळवारी मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ासह विदर्भातही तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांची प्रक्रिया घडून पाऊस पडू शकेल.राज्यात विदर्भात उष्णतेच्या लाटेची स्थिती आहे व अजून एक दिवस तरी ती कायमच राहण्याची शक्यता आहे.