12 August 2020

News Flash

सोमवारपासून राज्यात पावसाची शक्यता

कोकणात अतिवृष्टी; मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

संग्रहित छायाचित्र

जुलैमध्ये काही भागांत पावसाने ओढ दिल्यामुळे चिंता व्यक्त होत असतानाच ऑगस्टच्या पहिल्याच आठवडय़ात राज्यात चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अनुकूल स्थिती निर्माण होत असल्याने मुंबई, ठाण्यासह कोकण विभागात बहुतांश ठिकाणी येत्या दोन दिवसांमध्ये मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ातही प्रामुख्याने घाट क्षेत्रांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान विदर्भासह राज्यात सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी असणार आहे.

जूनमध्ये राज्यात चांगला पाऊस झाला असला, तरी जुलैच्या पावसाने अनेक भागांत हुलकावणी दिली.

मराठवाडय़ापासून तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा असल्याने गेल्या चोवीस तासांत मराठवाडय़ात काही ठिकाणी मुसळधार आणि राज्यात इतरत्र तुरळक पावसाची नोंद झाली. उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाच्या क्षेत्राचे संकेत आहेत. परिणामी राज्यात पावसाला अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे. याच स्थितीमुळे काही ठिकाणी अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस, तर तीन ते चार दिवस राज्यात सर्वत्र पाऊस होण्याचा अंदाज देण्यात आला आहे.

पावसाची शक्यता कुठे, कधी?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३ ऑगस्टला पावसाचा जोर वाढणार आहे. या दिवशी कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ातील घाटक्षेत्रात मुसळधार पाऊस होईल. ४ ऑगस्टला कोकणासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, मराठवाडय़ात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. ५ ऑगस्टलाही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता असून, मराठवाडा आणि विदर्भातही कमी-अधिक पावसाचा अंदाज आहे.

कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड या भागांत अतिवृष्टी ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील घाटक्षेत्रात मुसळधार, तर नाशिक, नगर, सोलापूर, सांगली जिल्ह्य़ात कमी-अधिक प्रमाणात पाऊस होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 12:33 am

Web Title: chance of rain in the state from monday abn 97
Next Stories
1 लघु उद्योजक घायकुतीला
2 पदविका अभ्यासक्रमाचे दोनच फेऱ्यांमध्ये प्रवेश
3 पुण्यात दिवसभरात २३ करोनाबाधितांचा मृत्यू, नव्याने आढळले १,५०६ रुग्ण
Just Now!
X