पावसाचा जोर सध्या काहीसा ओसरला असला, तरी कोकणात कमी-अधिक प्रमाणात पाऊस कायम राहणार असून, २६ ऑगस्टपासून प्रामुख्याने विदर्भात चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील घाटक्षेत्रातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडतील. दरम्यान, गेल्या चोवीस तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रातील घाटक्षेत्रांत पावसाची नोंद झाली.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रावरून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे पाणीसाठय़ात मोठी वाढ झाली आहे. सध्या बंगालच्या उपसागरात नव्याने निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढते आहे. अरबी समुद्रातून वारे वाहत आहेत. या स्थितीमुळे देशाच्या पश्चिमोत्तर भागांत दोन दिवसांनंतर जोरदार पावसाला अनकूल स्थिती आहे. राज्यातही या स्थितीचा काहीसा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २५ ऑगस्टला कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या दिवशी विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जना आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सोसाटय़ाचा वारा वाहणार आहे. २६ आणि २७ ऑगस्टला विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. १८ ऑगस्टला कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.