हिंदुत्वाच्या मुद्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांची जी हिंदुत्वाची कल्पना आहे, तितकी मर्यादित हिंदुत्वाची कल्पना आमची नाही, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले आहे.

या अगोदर शरद पवार यांनी कोल्हापूरात बोलताना, देशात केवळ हिंदुत्ववादाचा विचार चालवणे हे देशासाठी घातक आहे. सर्व धर्मियांचा सन्मान करणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले होते. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील पुण्यात बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, हिंदुत्व म्हणजे संस्कृती, हिंदुत्व म्हणजे जगण्याचे नियम जे जगण्याचे नियम या देशात, या संस्कृतीत आदर्श होते. जगाने त्याचं अनुकरण केलं आणि आजही संपूर्ण जग त्याचे अनुकरण करत आहे. एका वाक्यात सांगायचं झालं तर आत्मीयता म्हणजे हिंदू आहे. तर, हिंदू हा केवळ पूजा पद्धतीशी जोडलेला विषय नाही, हे शरद पवारांनी लक्षात घ्यायला हवे. रामाचं मंदिर बांधणं हा जरी आमचा आग्रहाचा आणि श्रद्धेचा विषय असला तरी, ते बांधणं म्हणजेच काही हिंदुत्व नाही. हिंदुत्व म्हणजे आदर्श जीवनपद्धती आहे, असेही चंद्रकांतदादा यावेळी म्हणाले.