देशात बहुसंख्य हिंदू राहतात. त्यांच्या मतांप्रमाणेच देश चालणार आहे. अधिकारीही हिंदू आहेत. त्यांनाही सण आहेत. प्रशासन तुम्हाला त्रास देण्यासाठी बसलेले नाही. त्यामुळे गणेश मंडळाच्या ज्या मागण्या असतील त्यासंदर्भात प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढू, असे विधान पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती संस्थानाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचे पारितोषिक वितरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपाच्या नवनियुक्त शहराध्यक्षा माधुरी मिसाळ, महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, आमदार योगेश टिळेकर यांच्यासह संस्थानचे अध्यक्ष अशोक गोडसे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, गणोशोत्सवाच्या काळात नागरिकांना देखाव्यांचा आनंद घेता यावा, यासाठी वेळ वाढवून देण्याचा आणि विसर्जन मिरवणुकीत रात्रभर वाद्य वाजवू देण्याची मागणी गणेश मंडळाकडून केली जात आहे. यासंदर्भात मी प्रशासनाशी चर्चा करेल. त्यातून कायदेशीर आणि व्यावहारिक तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी मला थोडा वेळ द्या. हे प्रश्न फक्त गुन्हे दाखल करून नव्हे तर प्रबोधनातून सुटतील. देशात बहुसंख्य हिंदू राहतात. त्यांच्या मतांप्रमाणेच देश चालणार आहे. अधिकारी हिंदू आहेत. त्यांनाही सण आहेत. प्रशासन तुम्हाला त्रात देण्यासाठी बसलेले नाही. त्यामुळे गणेश मंडळाच्या ज्या मागण्या असतील त्यावर तोडगा काढू, असेही ते म्हणाले.

गणेश मंडळाचे कार्यकर्ते असलेले हेमंत रासने विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. यासंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, शहराध्यक्षा माधुरी मिसाळ गणेशभक्तांचे ऐकतील आणि गणपती बाप्पा रासने यांचीही इच्छा पूर्ण करतील, असे सूतोवाच पाटील यांनी केले. दरम्यान, गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी दिवसांची मर्यादा वाढवावी तसेच विसर्जन मिरवणूकासाठी रात्री १२ वाजेनंतरही वाद्य वाजवण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी यावेळी दिली.