मागील पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगली कामे केली आहेत. परंतु निवडणुकीत दगाफटका झाला नसता, तर त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळाचा रेकॉर्ड देखील तोडला असता, असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ नागरी सत्कार समिती कोथरूडच्यावतीने पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांची निवडी झाल्याबद्दल माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोहोळ यांचा सोमवारी विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात आमदार चंद्रकांत पाटील बोलत होते.

यावेळी खासदार गिरीश बापट, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, शिवसेनेचे माजी मंत्री शशीकांत सुतार, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकात मोकाटे, काँग्रेस पक्षाचे माजी आमदार रमेश बागवे, मनसेचे नेते बाबू वागसकर आदी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मुरलीधर मोहोळ यांना राजकीय पार्श्वभूमी नाही, मी पण गिरणी कामगाराचा मुलगा असून मंत्री झालो, प्रदेशाध्यक्ष देखील झालो. मुरलीधर मोहोळ यांच्यावर अजून अनेक जबाबदाऱ्या येणार आहेत. देवेंद्रजींना पुढचं कळतं, तर मला भविष्य कळत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

कोथरुड विधानसभा निवडणुकीसाठी माझी उमेदवारी जाहीर झाल्यावर मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त न करता, निवडणुकीत काम केले. मात्र, माझ्या विरोधात अंकुश काकडे यांनी शरद पवार साहेबांना मतदार संघात फिरवले, आमच्याकडे तशी त्यावेळच्या यंत्रणेकडून माहिती मिळत होती. मात्र मुरलीधर मोहोळ यांना विजयासाठी पराकाष्ठा केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व माजी महापौर अंकुश काकडे यांनी त्यांच्या भाषणात सर्व पक्षीय नेत्यांना चिमटे काढण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच भाषणाचा धागा पकडत चंद्रकांत पाटील म्हणाले की, देवेंद्रजींनी चमत्कार केला तर अंकुश अण्णांना पुन्हा पक्षात बोलवेन. पण शरद पवार यांना विचारल्या शिवाय ते काही करत नसल्याच त्यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची कार्यक्रमाला अनुपस्थिती –
विधानसभा निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघामधून भाजपाकडून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलण्यात आले होते. त्यामुळे त्या नाराज झाल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. परंतु त्यानंतर काही प्रमाणात पक्षाच्या कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावल्याचे पहावयास मिळाले. मात्र, आज कोथरूड मधील मुरलीधर मोहोळ यांची महापौरपदी निवडझाल्याबद्दल नागरी सत्काराच्या कार्यक्रमाला त्यांची अनुपस्थिती होती. त्यांच्या गैरहजेरीने अनेक राजकीय चर्चा देखील रंगल्याचे पाहावयास मिळाले.