भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे महत्त्वाची खाती असून प्रदेशाध्यक्ष पदावर काम करत आहेत. चंद्रकांत पाटलांकडून राजकीय विधानं वारंवार केली जात आहेत. यातून जनतेच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम होत आहे. असे प्रकार एका पक्षाच्या जबाबदार व्यक्तीकडून होता कामा नये. असा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला. तसेच, वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटील यांना सवय आहे. त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष न दिलेले बरे असेही ते म्हणाले. पुण्यातील एका कार्यक्रमासाठी ते आले असता त्यांनी कार्यक्रमानंतर पत्रकाराशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी विमा कंपनीविरोधात शिवसेनेकडून काढल्या गेलेल्या मोर्चावर टीका केली. ते म्हणले की, शिवसेनेने विमा कंपन्याच्या कार्यालयांवर काढलेला मोर्चा हा दुटप्पीपणा आहे. सेनेच्या मोर्चाने प्रशासनावर सत्ताधार्‍यांचा वचक नसल्याचे यामधून सिद्ध झाले आहे. हा मोर्चा आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून काढण्यात आला असल्याचेही सांगत, त्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर त्यांनी निशाणा साधला.

तर, लोणी काळभोर येथील अपघाताबाबत विचारले असता ते म्हणाले की, पावसाळ्याआधी रस्त्यांची कामे करण्याची गरज होती. मात्र ते करण्यात आली नाहीत. वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज असून त्या ठिकाणी सबवे किंवा स्कायवॉक करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.