ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल भारद्वाज यांचा विश्वास

चांद्रयान २ ही मोहीम चांद्रयान १ या मोहिमेपेक्षा पूर्णत वेगळी आहे. कारण चांद्रयान २ मध्ये यान प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार आहे. त्यामुळे त्यासाठीचे तंत्रज्ञान, उपकरणे अत्यंत अद्ययावत आणि सुसज्ज आहेत. या उपकरणातून पाणी, क्षार इतकी सूक्ष्म माहितीही मिळू शकणार आहे, अशी माहिती फिजिकल रीसर्च लॅबोरेटरीचे प्रमुख, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल भारद्वाज यांनी दिली. तसेच चांद्रयान २ मधून उलगडणारे विज्ञान अधिक नावीन्यपूर्ण असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संशोधन, आशय फिल्म क्लब, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि रावत नेचर अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सायफाय फेस्ट’मध्ये डॉ. भारद्वाज यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते. डॉ. भारद्वाज यांनी उपस्थितांना चंद्र आणि मंगळ या ग्रहांवर झालेल्या मोहिमांची अत्यंत रंजकपणे सचित्र माहिती दिली. त्यामुळे चंद्र आणि मंगळाची  उपग्रहांनी टिपलेली छायाचित्रे पाहण्याची संधी उपस्थितांना मिळाली. तसेच या मोहिमांमागे केलेले कष्ट, अभ्यास आणि या मोहिमांना मिळालेल्या यशाला टाळ्यांची दाद देण्यात आली.

चांद्रयान १ आणि  मंगलयान या दोन्ही मोहिमांतून समोर आलेली माहिती महत्त्वपूर्ण आहे. नवे विज्ञान उलगडत आहे. या दोन्ही ग्रहांवर असलेले वातावरण, छायाचित्रांमध्ये दिसलेले ढग अशा अनेक पैलूंचा अभ्यास सुरू आहे. जीवसृष्टीसाठी ऑक्सिजन, पाणी लागत नाही. जीवसृष्टी ही संकल्पना अधिक व्यापक झाली आहे. या दोन्ही मोहिमा अत्यंत कार्यक्षमपणे आणि पूर्वाभ्यासामुळे यशस्वी ठरल्या, असेही डॉ. भारद्वाज यांनी सांगितले.