क्रिकेटच्या मैदानावर खेळताना चंदू बोर्डे यांनी जेवढय़ा धावा केल्या तेवढीच आयुष्याच्या खेळीमध्ये माणसेही जोडली, असे मत रेव्ह. भास्कर सोज्वळ यांनी व्यक्त केले.
चंदू बोर्डे आणि विजया बोर्डे यांच्या विवाहाच्या सुवर्णमहोत्सव पूर्तीनिमित्त क्राईस्ट चर्च येथे विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. रेव्ह. सी. पी. भुजबळ यांनी प्रार्थनेचे नेतृत्व केले.
चंदू बोर्डे म्हणाले, विजयाला मी पहिल्यांदा याच चर्चमध्ये पाहिले होते. तिने माझी सही घेतली आणि आमच्या आयुष्यातील भागीदारीला सुरुवात झाली. आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये पत्नीची मोलाची साथ मिळाली असून मुलांचा अभिमान आहे. विजया बोर्डे म्हणाल्या, चंदूकडे असलेली सहनशीलता मला शिकायला मिळाली. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानायचे हा गुण मी त्यांच्याकडून आत्मसात केला.
दरम्यान डॉन बॉस्को यूथ सेंटर येथे स्वागत समारंभ झाला त्यावेळी बोर्डे यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.