20 October 2019

News Flash

‘स्माईल’च्या ‘चेंजमेकर्स’ उपक्रमात १२५ गटांचा सहभाग

स्वत:मध्ये आणि आपल्या सभोवतालामध्ये बदल घडवून आणण्याची महिलांची शक्ती ध्यानात घेऊन ‘स्माईल’ या स्वयंसेवी संस्थेने राबविलेल्या ‘चेंजमेकर्स’ या उपक्रमात १२५ गटांनी सहभाग घेतला आहे.

| March 24, 2015 03:06 am

आपल्या परिसरातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी केवळ नगरसेवक किंवा आमदार यांच्यावर अवलंबून न राहता महिला याच परिवर्तनाच्या दूत म्हणजेच चेंजमेकर्स झाल्या आहेत. स्वत:मध्ये आणि आपल्या सभोवतालामध्ये बदल घडवून आणण्याची महिलांची शक्ती ध्यानात घेऊन ‘स्माईल’ या स्वयंसेवी संस्थेने राबविलेल्या ‘चेंजमेकर्स’ या उपक्रमात १२५ गटांनी सहभाग घेतला आहे. ज्या महिला पूर्वी कधी वॉर्ड कार्यालयातही गेल्या नव्हत्या अशा महिलांमध्ये संघशक्तीद्वारे आपल्या समस्या सोडविण्यासाठीची जागृती घडून आली आहे.
या उपक्रमामुळे महिला आणि नागरिकांमध्ये सकारात्मकता आली असून त्यांच्यामध्ये आत्मविश्वासही वाढला आहे, अशी माहिती स्माईलच्या संस्थापक खासदार वंदना चव्हाण यांनी सोमवारी दिली. स्थानिक पातळीवर व्यापक बदल घडविण्यासाठी महिलांना कार्यरत करणाऱ्या ‘चेंजमेकर्स’ या ‘लोकल एरिया मॅनेजमेंट’ उपक्रमाचा जागितक पर्यावरण दिनी शुभारंभ करण्यात आला होता. पुण्यातील मोहल्ल्यांमध्ये तीन महिलांचा सहभाग असलेली किमान पाच व्यक्तींची स्थानिय समिती स्थापन करण्यात आली होती. या गटाची प्रमुख महिलाच होती. परिसरातील छोटय़ा-मोठय़ा समस्या निवारण करण्यासाठी आणि एकात्मता वाढविण्यासाठी या गटांनी योगदान दिले. कचरा वर्गीकरण, शक्य असेल तेथे गांडूळखत प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घेणे, वीज-पाणी-इंधन बचतीसाठी जागृती करणे, पर्यावरणपूरक पद्धतीने सण-उत्सव साजरे करणे, आरोग्य शिबिरांचे आयोजन आणि महिला सक्षमीकरण या कामांमध्ये १२५ गटांनी सहभाग घेतला. वृक्षारोपण, परिसर सुशोभीकरण, सामाजिक समस्यांवरील उपक्रमात महिला आणि नागरिक अन्य शंभर घरांपर्यंत जागृतीसाठी पोहोचले. नागरिकांचे श्रमदान आणि महापालिकेचे सहकार्य यातून परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा आराखडा करून त्याची कार्यवाही करण्यात आली अशी माहिती वंदना चव्हाण यांनी दिली.
‘चेंजमेकर्स’च्या उपक्रमांतर्गत सिंहगड रस्ता, सहकारनगर, वारजे-कर्वेनगर, पर्वती, बिबवेवाडी, भवानी पेठ, कोंढवा-वानवडी परिसरामध्ये नागरिकांचे गट करून या परिसराचा विकास करण्यात आला आहे. नीला विद्वांस या प्रमुख समन्वयकांच्या जोडीला संजीवनी जोगळेकर आणि प्रदीप्ता कुलकर्णी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. बालगंधर्व रंगमंदिर येथे बुधवारी (२५ मार्च) दुपारी साडेबारा वाजता या उपक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. याअंतर्गत सवरेत्कृष्ट काम करणाऱ्या १२ गटांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार असल्याचे वंदना चव्हाण यांनी सांगितले. 

First Published on March 24, 2015 3:06 am

Web Title: changemakers by smile
टॅग Vandana Chavan