‘शिक्षणाची माध्यमे आणि माहितीची साधने इतकी वाढली आहेत, की येत्या काळात शिक्षण हे महाविद्यालयांच्या इमारती किंवा वर्गामध्ये बंदिस्त राहणार नाही. याच बदलांबरोबर शिक्षणाच्या बाजारीकरणाला आपोआपच आळा बसणार आहे,’ असे मत सिम्बॉयसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना बुधवारी व्यक्त केले.
डॉ. मुजूमदार गुरुवारी (३१ जुलै) ८० व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. गेली साठ वर्षे ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. भारत सरकारने २००५ साली ‘पद्मश्री’ आणि २०१२ मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्कार देऊन डॉ. मुजूमदार यांचा गौरव केला आहे. डॉ. मुजूमदार यांच्याशी लोकसत्ता प्रतिनिधीने संवाद साधला. शिक्षणातील बदलते प्रवाह, त्या अनुषंगाने शिक्षणसंस्था आणि शिक्षकांची बदलत जाणारी भूमिका, नव्या वाटा चोखाळण्याची गरज अशा विविध मुद्दय़ांवर डॉ. मुजूमदार यांनी या वेळी भाष्य केले.
या वेळी डॉ. मुजूमदार म्हणाले, ‘शिक्षण आणि माहितीची साधने वाढली आहेत. पूर्वी वर्गात एखाद्या विषयाची माहिती देण्याचा शिक्षक हाच प्रमुख स्रोत होता. मात्र, आता विद्यार्थ्यांना माहिती मिळवण्यासाठी अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. त्यामुळे आता शिक्षकांची भूमिकाही बदलली आहे. शिक्षकाने आता दिशादर्शक असणे आवश्यक आहे. या परिस्थितीत चांगले काम करणाऱ्या संस्थाच तग धरू शकतील आणि बाजारीकरणाला आपोआप आळा बसेल.
युवाशक्ती ही भारताची मोठी संपत्ती आहे. मात्र, तरुणांमधील ऊर्जेला योग्य वळण मिळणे, तरुणांना सतत्याने नव्या उपक्रमांमध्ये गुंतवून ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर आता संपत्ती वाटणारी ही ऊर्जा धोकादायक ठरू शकते. तरुणांना त्यांच्या योग्यतेचे काम, संधी मिळाल्या नाहीत, तर हीच तरुणाई चुकीच्या गोष्टींकडे वळेल. त्यासाठी तरुणांमधील कौशल्याचा विकास करणे आणि रोजगाराभिमुख शिक्षण देणे आवश्यक आहे. या बदलत्या परिस्थितीत शिक्षणसंस्थांची आणि शिक्षकांची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची आहे. बदलत्या गरजेनुसार शिक्षणसंस्थांनी नव्या वाटा चोखाळणे आवश्यक आहे.’
विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत भारतीय विद्यापीठांचे स्थान, शिक्षणाची गुणवत्ता यांबाबत डॉ. मुजूमदार म्हणाले, ‘परदेशी विद्यापीठांना लावले जाणारे निकष भारतीय विद्यापीठांना लावणे योग्य ठरणारे नाही. उच्च शिक्षणाचा प्रसार होणे, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढणे, शिक्षणात सर्वसमावेशकता आणणे, त्याचवेळी गुणवत्ता वाढवणे, शिक्षणाची रोजगाराभिमुखता वाढवणे, अशा अनेक आघाडय़ा भारतीय शिक्षणव्यवस्थेला एकाच वेळी सांभाळाव्या लागत आहेत. शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत विचार करता सध्या संशोधन, सांस्कृतिक जडणघडण यांपासून शिक्षण व्यवस्थेने फारकत घेतल्याचे दिसत आहे. त्याचा परिणाम गुणवत्तेवर आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवरही होताना दिसत आहे. शिक्षक या पदाचा सामाजिक आधार वाढावा, यासाठी गुणवत्ता असलेली तरुणाई शिक्षकी पेशाकडे वळेल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’