करोना विषाणू संसर्गामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतानाच ‘नवसंकल्पना’ क्षेत्रावरही (इनोव्हेशन) परिणाम होत आहे. त्यामुळे नवसंकल्पनांची दिशा बदलत असून, नवसंकल्पनांसाठी औषधनिर्माण, सेवा पुरवठा, कृत्रिम बुद्धिमत्ता, शिक्षण, वैद्यकीय, रोबोटिक्स, आरोग्यनिगा अशा क्षेत्रात नव्या संधी निर्माण होऊ शकतात.

काही दिवसांपूर्वीच ‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स’ हा अहवाल जाहीर झाला. करोना संसर्गाचा नवसंकल्पनांवर परिणाम होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०१८ मध्ये संशोधन विकासावरील खर्चात ५.२ टक्के  वाढ झाली. मात्र नवसंकल्पनांच्या बहराच्या काळातच आलेल्या करोना संसर्गामुळे नवसंकल्पना क्षेत्र अडचणीत आले आहे. उत्तर अमेरिका, आशिया, युरोपमधील नवसंकल्पना क्षेत्र गुंतवणूक नसल्याने अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील नवसंकल्पना क्षेत्राची येत्या काळात वाटचाल होणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे मुख्य नवसंकल्पना अधिकारी डॉ. अभय जेरे म्हणाले, की करोना संसर्गामुळे नवसंकल्पनांसमोर आव्हान निर्माण झाले असले, तरी ही एकप्रकारे संधीच ठरणार आहे. कारण नवउद्यमी नव्या संकल्पना घेऊन उद्योग सुरू करतील, त्यातून अर्थव्यवस्थेला दिशा मिळेल. तसेच नवे गुंतवणूकदारही पुढे येतील.

नवसंकल्पना क्षेत्रात वेगळ्या कल्पना महत्त्वाच्या आहेतच, पण त्या कल्पना प्रत्यक्षात कशा येतात हे जास्त महत्त्वाचे असते. उद्योग क्षेत्राच्या दृष्टिकोनातून आर्थिक अडचणींमुळे वैज्ञानिक नवसंकल्पनांसारख्या क्षेत्रातील गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो. पण या संकटाला संधी समजून ज्या कंपन्या किंवा गुंतवणूकदार या काळात नवसंकल्पनांवर गुंतवणूक करतील, त्यांना त्याचे फळ नक्कीच आणि मोठे मिळेल, असे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने म्हणाले.

येत्या काळात स्वदेशी उत्पादनाच्या नवसंकल्पनांना अनेक संधी निर्माण होऊ शकतात. संशोधनासाठीची गुंतवणूक कमी होऊ शकते. काही नवसंकल्पनांना आर्थिक अडचणी येऊ शकतात. पण ही परिस्थिती जास्त काळ राहणार नाही. नवसंकल्पनांचे प्राधान्यक्रम ठरवून त्यात गुंतवणूक होऊ शकते. पण नवसंकल्पांचे भविष्य निश्चितच चांगले आहे, अशी आशा व्हेंचर सेंटर(राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा) संचालक डॉ. प्रेमनाथ वेणुगोपालन यांनी व्यक्त केली.