संथपणाचा कळस; उद्घाटनाची प्रतीक्षा कायम
देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात बलिदान देणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूंचे चिरंतन स्मरण राहावे, यासाठी चिंचवडगावात त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय पिंपरी महापालिकेने घेतला. मात्र, सात वर्षे पूर्ण होत आली तरी याबाबतची प्रक्रिया पूर्णत्वाला गेलेली नाही. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हाधिकारी कार्यालय ते राज्य सरकार या दरम्यान विविध टप्प्यांवर लाल फितीच्या विचित्र कारभाराचा फटका बसल्याने स्मारकाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा अद्याप संपलेली नाही.
हुतात्मा दामोदर हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर, वासुदेव हरी चापेकर आणि महादेव गोविंद रानडे या क्रांतिवीरांचे पूर्णाकृती पुतळे उभारून त्यांचे समूहशिल्प तयार करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी झाला. चिंचवड ग्रामस्थ, चापेकर स्मारक समिती, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी पालिकेच्या निर्णयाचे स्वागत करून पूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही दिली. मोठा गाजावाजा करून २५ ऑगस्ट २०१० मध्ये स्मारकाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. तेव्हा वेगाने काम करण्याची ग्वाही पालिकेने दिली. मात्र, प्रत्यक्षात संथपणाने कळस गाठल्याचे वेळोवेळी दिसून आले. तब्बल चार वर्षांनंतर या चौथऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्यातूनही कोणताच धडा न घेतलेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या संथ कारभाराचा परिणाम म्हणूनच अजूनही स्मारकाचे काम पूर्ण झालेले नाही.
सुरुवातीला पुतळे तयार करण्यात आले, तेव्हा पुतळ्यांची उंची खूपच कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यात बदल करण्यात आले. त्यानंतर, सात ते १२ फुटांपर्यंतची उंची असलेले सुधारित पुतळे करण्यात आले. ते कित्येक दिवसांपासून नाशिक येथे तयार स्थितीत आहेत. चिंचवडला चौथरा तयार अवस्थेत आहे. मात्र, शासकीय पातळीवरील काही कामे पूर्ण व्हायची आहेत म्हणून स्मारकासाठी मुहूर्त मिळत नाही, त्यामुळे सगळे खोळंबले आहेत. स्मारकाचे काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते तसेच सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत स्मारकाचे उद्घाटन व्हावे, या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळाल्यानंतर १५ दिवसात काम पूर्ण होईल, असे आठ महिन्यांपूर्वी सांगण्यात आले होते. त्यानंतर, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्मारक समितीच्या सदस्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले. लवकरच काम होईल, असेच आश्वासन त्यांना प्रत्येकवेळी मिळत गेले. प्रत्यक्षात अपेक्षित कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे उद्घाटनाची प्रतीक्षा कायम आहे.