पुण्यातील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे 30 जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप युवा मोर्चाचे पुणे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी शरजील उस्मानी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी स्वारगेट पोलिसांकडे केली होती.

पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारतर्फे तातडीने आणि कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना याबाबत एक पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आता शरजील उस्मानी विरोधात स्वारगेटमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.