करोना विषाणूमुळे मागील तीन महिन्यांपासून देशभरातील संपूर्ण बाजार पेठ ठप्प झाल्याने, सर्व सामान्य नागरिकांचे जगणे अवघड झाले. त्या दरम्यान अनेक लोकप्रतिनिधी, संस्था, संघटनामार्फत गरजू व्यक्ती पर्यंत जेवण, जीवनावश्यक वस्तू, मास्क वाटप केल्याचे, आपण सर्वांनी पाहिले आहे. आता त्याच्या ही पुढे जाऊन सर्व सामान्य कुटुंबातील भोर तालुक्यातील किवत गावातील काजल पवार ही तरुणी वीटभट्टीवर काम करून त्यामधून येणार्‍या मजुरीच्या पैशातून त्या भागातील गरजू नागरिकांना अन्नधान्य, मास्क वाटण्याचे काम करीत आहे. या तिच्या कार्याचे समस्त ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.

या पार्श्वभूमीवर काजल पवार हिच्याशी संवाद साधला असता ती म्हणाली, आमच्या घरी मी, भाऊ आणि आई  असे आम्ही तिघेजण राहतो. वडिलांचे दहा वर्षांपुर्वीच निधन झाले. तेव्हापासून मी आणि भाऊ वीटभट्टीवर काम करीत आहोत.  वीटभट्टीवर काम नसेल, तर मिळेल ते काम करीत असल्याचेही ती म्हणाली.

आणखी वाचा- आठ तास ‘पीपीई’ कीट घालून उपचार करत, लहान मुलांना करोनामुक्त करणारी ‘हिरकणी’

तसेच त्या म्हणाल्या की, आम्ही दोघ भावंड घर सांभाळत असून मी माझे शिक्षण देखील सुरू ठेवले आहे. मी आता बीए करत आहे. शिक्षण सुरू असल्याने, बाहेरील परिस्थिती अधिक माहिती आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी काम करतेवेळी आपल्या परिसरातील नागरिकाची परिस्थिती पाहून, आपण या नागरिकांना आपल्यापरीने काही तरी मदत करावी, असे वाटले. पण मला वीटभट्टीवर साधारण दररोज 250 रुपयांच्या आसपास मजुरी मिळते. त्यातून कसे शक्य होणार असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा घर खर्चाचे पैसे बाजूला काढून, त्यातील जे काही शिल्लक राहतील. त्यातून गरजू नागरिकांना जीवनावश्यक साहित्य द्यायच ठरविले आणि पैसे जमविण्यास सुरुवात केली. काही पैसे जमविल्यानंतर गरजू नागरिकांना साहित्य देण्यास सुरुवात केली. ज्या नागरिकांना वस्तू देण्यास मी जात असे तेव्हा त्या सर्वांना  आश्चर्य वाटत होतं. ही मुलगी एवढ काम करून आपल्यासाठी वस्तू देत असल्याचे पाहून त्यांच्या डोळ्याच्या कडा  अनेकवेळा पाणावल्याचे पहावयास मिळाले.

मी माझ्या परीने गरजू नागरिका पर्यंत मदत पोहोचविण्याचे काम करीत आहे. या कार्यात विशेषत : भाऊ आणि आईची मोलाची साथ मिळत आहे. यामुळे एक कार्य करणे शक्य झाले असून या कार्यातून एक वेगळच समाधान मिळत असल्याची भावना तिने यावेळी व्यक्त केली.