16 October 2019

News Flash

चारुदत्त सरपोतदार यांचे निधन

त्यांच्यामागे किशोर आणि अभय हे दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

मराठी चित्रपट आणि नाटय़सृष्टीचा चालता-बोलता इतिहास, कलाकारांचे आधारवड, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे मानसपुत्र, सामाजिक कार्यकर्ते आणि ‘पूना गेस्ट हाऊस’चे चारुदत्त ऊर्फ चारुकाका नानासाहेब  सरपोतदार (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे किशोर आणि अभय हे दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

चारुकाका सरपोतदार यांचे पार्थिव शनिवारी (२० जानेवारी) लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊस येथे सकाळी नऊ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमी येथे अकरा वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या नानासाहेब सरपोतदार यांच्या कुटुंबामध्ये १५ मे १९३० रोजी चारुकाका यांचा जन्म झाला. भालजी पेंढारकर यांच्या तालमीमध्ये घडलेल्या चारुकाका यांना लष्करामध्ये भरती व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूल येथून शिक्षण घेतले. घरामध्ये चित्रपटसृष्टीचे वातावरण असताना त्यांनी पूना गेस्ट हाऊसमध्ये लक्ष घातले. ज्येष्ठ बंधू विश्वास ऊर्फ बाळासाहेब सरपोतदार, गजानन सरपोतदार हे चित्रपट निर्मितीमध्ये व्यग्र असताना चारुकाका त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि नाटय़ परिषदेच्या पुणे शाखेची स्थापना करण्यामध्ये चारुकाकांचा पुढाकार होता. चित्रपट महामंडळाचे ते संस्थापक-अध्यक्ष होते. नाटय़ परिषदेच्या शाखेची स्थापना करताना त्यांनी चित्तरंजन कोल्हटकर यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपविली होती. सावरकर यांच्या विचारांनी प्रेरित असलेले चारुकाका हिंदू महासभेचे सात वर्षे अध्यक्ष होते.

चारुकाका सरपोतदार यांनी चार चित्रपटांची निर्मिती केली होती. ‘घर गंगेच्या काठी’ आणि ‘जावई माझा भला’ या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार लाभले होते. पुणे खाद्यपेय विक्रेता संघाचे संस्थापक असलेल्या चारुकाकांनी ४४ वर्षे संघाचे अध्यक्षपद भूषविले. पूना गेस्ट हाऊसची धुरा त्यांनी सात दशकांहून अधिककाळ समर्थपणे सांभाळली. अनेक ज्येष्ठ कलाकारांना त्यांच्या वार्धक्यामध्ये चारुकाकांनी घरच्याप्रमाणे सांभाळून सेवा दिली. कोल्हापूर येथील भालजी पेंढारकर कल्चरल सेंटरचे ते संस्थापक होते. अिजक्य हॉर्स रायिडग क्लब, शाहू मोडक प्रतिष्ठान, ससून रुग्णालयाच्या आवारातील अनाथ मुलांचा सांभाळ करणारी श्रीवत्स संस्था, काशिनाथ घाणेकर ट्रस्ट अशा विविध संस्थांच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते.

First Published on January 20, 2018 12:59 am

Web Title: charudatta sarpotdar passed away