‘सहज बोलता बोलता’मध्ये गुरुवारी किरण पुरंदरे यांच्याशी संवाद

पुणे : दिवाळीच्या थंडीची चाहूल लागताच राज्यातील पाणवठय़ांवर दरवर्षी पक्ष्यांचे स्थलांतर कसे होते, हजारो किलोमीटरचे अंतर पार करून पक्षी दरवर्षी त्याच ठिकाणी कसे येतात या प्रश्नांसह पक्षी विश्वाबद्दलच्या अद्भुत माहितीची सफर ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ उपक्रमात गुरुवारी (१२ नोव्हेंबर) ज्येष्ठ पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांच्याशी होणाऱ्या गप्पांतून घडेल.

वनमहर्षी मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन (५ नोव्हेंबर) आणि ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचा जन्मदिन (१२ नोव्हेंबर) या दोन्ही पक्षीतज्ज्ञांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५ ते १२ नोव्हेंबर हा ‘पक्षी सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हे औचित्य साधून ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’मध्ये पक्षी अभ्यासक किरण पुरंदरे यांच्याशी गप्पांची मैफील आयोजित करण्यात आली आहे.

निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून अभ्यासक, रक्षक, शिक्षक आणि लेखक म्हणून किरण पुरंदरे कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे पुणे जिल्ह्य़ासाठी ‘मानद वन्यजीव रक्षक’ म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. प्राणी, पक्षी आणि जैवविविधता या विषयांवर पुरंदरे यांची बाराहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी, ‘आभाळवाटांचे प्रवासी’ आणि ‘सखा नागझिरा’ या पुस्तकांना राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार मिळालेला आहे.

मुलाखतीत काय? : पक्षी स्थलांतर का करतात? हजारो किलोमीटर अंतर पार करून पक्षी त्याच ठिकाणी दरवर्षी कसे येतात? पक्ष्यांचा आवाज म्हणजे केवळ सुमधुर गायन असते की दोन पक्ष्यांमधील संवाद? सिमेंटची जंगले झालेल्या शहरात पक्ष्यांचे अस्तित्व किती उरले आहे? एखाद्या पक्ष्याचे नाहीसे होणे म्हणजे काय? पक्षी विश्वाबद्दलच्या या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे किरण पुरंदरे यांच्या मुलाखतीतून मिळणार आहेत.

सहभागासाठी :  http://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_12Nov

येथे नोंदणी आवश्यक.