खासगी बँकेकडून कर्ज मंजूर करण्याच्या आमिषाने देशभरात अनेकांना गंडा घालणाऱ्या दिल्लीतील भामटय़ांना पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने जेरबंद केले. या टोळीने देशभरात ५५ ते ६० नागरिकांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे, तसेच महाराष्ट्रातील अकरा जणांना कर्ज मंजूर करण्याच्या आमिषाने साठ ते पासष्ट लाखांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे.
सोनूसिंग रमेश सिंग (वय २५, रा. आझादनगर, कृष्णा कॉलनी, समलखा, जि. पानीपत, हरयाणा) आणि रमण राजेंदरसिंग नेगी (वय २१, रा. जे.जे. कॉलनी, सुभाषनगर, नवी दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या भामटय़ांची नावे आहेत. कोथरूड परिसरातील रहिवासी सतीश भास्कर मोरे यांना एप्रिल महिन्यात सिटी बँकेतून अमन वर्मा बोलत असून तातडीने कर्ज मंजूर करून देतो, असा दूरध्वनी भामटय़ांनी केला होता. मोरे यांना पंधरा लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर कर्जप्रकरणासाठी लागणारी कागदपत्रे मोरे यांनी भामटय़ांनी दिलेल्या इमेलवर स्कॅन करून पाठविली. भामटय़ांनी त्यांना कर्जमंजूर करण्यासाठी ४५ हजार रुपये भरण्यास सांगितले. भामटय़ांच्या आमिषाला बळी पडलेल्या मोरे यांनी एका बँकखात्यात पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर मोरे यांनी पैसे भरले. परंतु कर्ज मंजूर करण्यात आले नाही. त्यामुळे मोरे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सायबर गुन्हे शाखेकडून या गुन्ह्य़ाचा तपास सुरू केला.
दरम्यान, ज्या बँकखात्यात मोरे यांनी पैसे भरले होते. त्या खात्याची पडताळणी करण्यात आली. तेव्हा ते खाते सोनू सिंग याच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले. सिंग आणि त्याचा साथीदार नेगी हे दिल्लीत एक कॉलसेंटर चालवीत होते. फसवणूक करण्यासाठी या कॉलसेंटरच्या माध्यमातून सिंग आणि नेगी नागरिकांशी संपर्क साधत होते. पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेचे पथक दिल्लीला रवाना झाले. तेथे छापा टाकून सिंग आणि नेगी यांना पकडण्यात आले. त्यांचे आणखी साथीदार असल्याचा संशय पोलिसांना आहे. नेगी आणि सिंग यांनी देशभरात अनेकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. महाराष्ट्रातील अकरा नागरिकांना त्यांनी साठ ते पासष्ट लाख रुपयांना गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सी.एच. वाकडे, उपायुक्त दीपक साकोरे, सहायक आयुक्त किशोर नाईक, सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संजय ठेंगे, विजयमाला पवार, सीमा साठे, उपनिरीक्षक प्रवीण स्वामी, मोहन साळवी, अस्लम अत्तार, अजित कुऱ्हे, राजू भिसे, राजकुमार जाबा, शिरीष गावडे, अमित अवचरे, अविनाश दरवडे, अश्विन कुमकर, तौसिफ मुल्ला, विजय पाटील, भास्कर भारती, बाबासाहेब कराळे, उज्ज्वला तांबे यांनी ही कारवाई केली.