निगडी येथील भाईचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या संचालक व व्यवस्थापक मंडळाच्या विरोधात ८९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ज्ञानेश्वर कराळे (वय ४८, रा. देहुगांव, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून सोसायटीचे संस्थापक संचालक प्रमोदकुमार भाईचंद रायसोनी, संचालक मधुकर विष्णू सानप, दिलीप कांतीलाल चोरडिया, सूरजमल बभुतमल जैन व इतर अकरा संस्थेच्या संचालक व व्यवस्थापकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा निगडी पोलिसांनी दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराळे यांनी निगडी येथील भाईचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप.क्रेडिट सोसायटीच्या शाखेमध्ये ४६ दिवसांच्या मुदतीवर ८९ लाख २० हजार रुपये ठेवले होते. कराळे यांच्या ठेवीची मुदत संपल्यानंतर ते पैसे काढण्यासाठी सोसायटीत गेले असता त्यांनी राखीव निधी संपला असल्याचे सांगितले. त्यांनी ठेवलेली ८९ लाख रुपयांची ठेवी परत करणे शक्य नाही म्हणून त्यांना रक्कम दिली नाही. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक निकाळजे हे अधिक तपास करीत आहेत.