गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याच्या आमिषाने हिम्बज हॉलिडेज कंपनीने महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यातील गुंतवणूकदारांची तीनशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्य़ांप्रमाणे आतापर्यंत पाच कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अकरा जणांस अटक करण्यात आली आहे.
गणेश बाळू शिंदे (वय ३३, रा. काळेवाडी परेलगाव, मुंबई), किरण सुधाकर आरेकर (वय २९, रा. मु. पो. नेवरे, ता. रत्नागिरी), दिनेश बळवंत सपकाळ (वय ३६, रा. अंबाया, रत्नागिरी), युवराज सतप्पा पाटील (वय ३२, रा. लालबाग, मुंबई), राजन मच्छिंद्र चाकणे (वय ३४, रा. शिवडी, मुंबई), महेश दत्ताराम पालकर (वय ३७, रा. पोमेंडी बुद्रुक, रत्नागिरी), यमचंद नारायण बनसोडे (वय ३६, रा. गयाळवाडी, रत्नागिरी), प्रभाकर धाकटोबा दळवी (वय ३६, रा. आंबडस, ता. खेड, जि. रत्नागिरी), मंगेश मधुकर शेर्लेकर (वय ३२, रा. साळगाव, ता. कुडाळ, सिंधुदुर्ग), गुरुनाथ जर्नाधन सावंत (वय ३३, रा. तुळसुली, ता. कुडाळ), संतोष तुकाराम काजरोळकर (वय ४२, रा. मुर्तवडे, ता. चिपळून) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी समीर श्रीरंग जाधव (वय २३, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिम्बज हॉलिडेज कंपनीने गुंतवणूक केल्यास मोठा परताना देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानुसार जाधव यांच्यासह इतर नागरिकांनी चार कोटी ९३ लाख रुपये या कंपनीत गुंतविल्याचे समोर आले आहे. या आरोपींवर राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. मुंबई येथे दाखल गुन्ह्य़ात त्यांना मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली होती. त्यानुसार त्यांना न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर कारागृहातून न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेण्यात आले आहे. यातील अटक आरोपी हे कंपनीने भागीदार व संचालक आहेत.
या आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. या आरोपींकडे तपासात आतापर्यंत चार कोटी ९३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तर, त्यांच्या साथीदारांचा शोध घ्यायचा आहे. या कंपनीने महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर तीनशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा पोलिसांना अंदाज असून ही रक्कम कोठे वळविली. त्याचा विनियोग काय केला याचा तपास करायचा आहे. कंपनीच्या बँक खात्याची माहिती घ्यायची आहे, त्यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. ती मान्य करून न्यायालयाने आरोपींना २० नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.